जखमी इस्पितळात : संशयित तीन दिवसांसाठी निलंबित

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : शाळेतील क्षुल्लक वादातून एका मुलाने १४ वर्षीय इयत्ता नववीच्या वर्गमित्राला जबर मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या मुलावर येथील उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर शाळा व्यवस्थापनाने संशयित मुलाला तीन दिवसांसाठी निलंबित केले आहे.
ही घटना म्हापशातील एका विद्यालयात गुरुवार, ५ रोजी सकाळी १०.३०च्या सुमारास घडली. मारहाण झालेल्या मुलाच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्याआधारे पोलिसांनी बाल न्याय मंडळाकडे अहवाल पाठवला आहे. मारहाण झालेल्या मुलाला संशयित मुलाने विद्यालयाच्या स्वच्छतागृहात बोलावून नेले आणि तिथे त्याला लाथाबुक्कीने जबर मारहाण केली. स्वच्छतागृहातून मुलाचा ओरडण्याचा आवाज येत असल्याने तिथे त्याच वर्गातील मुलगा गेला. त्याने मुलाला संशयिताच्या तावडीतून सोडवले आणि शिक्षकांना माहिती दिली. जखमी मुलाला जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. सायंकाळी मारहाण झालेल्या मुलाच्या पालकांनी पोलिसांत तक्रार नोंदवली.
निलंबन नको, बडतर्फ करा !
संशयिताची शाळेत दहशत असून क्षुल्लक कारणावरून तो कुणालाही मारझोड करतो. यापूर्वीही त्याने आपल्या मुलाला अनेकवेळा मारहाण केली आहे. तीन दिवसांच्या निलंबनानंतर तो परत आपल्या मुलासह इतरांना मारहाण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा वृत्तीच्या या मुलाला शाळेतून बडतर्फ करावे, अशी मागणी मारहाण झालेल्या मुलाच्या पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे केली आहे.