मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : फोंडा येथे ‘सरकार तुमच्या दारी’ कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद

फोंडा येथील ‘सरकार तुमच्या दारी’ कार्यक्रमात सत्कारमूर्तींसोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, आमदार गोविंद गावडे, मुख्य सचिन व्ही. कांदावेलू, जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस, रितेश नाईक व इतर.
प्रतीनिधी। गाेवन वार्ता
फोंडा : फोंडा येथील उपजिल्हा इस्पीतळात न्युरो सर्जन उपलब्ध करून देण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शहरात सिटी बसस्थानक उभारण्यासाठी फोंडा पालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी. स्व. रवी नाईक यांच्या स्वप्नातील फोंडा साकारण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरात शुक्रवारी आयोजित केलेल्या ‘सरकार तुमच्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर वीजमंत्री सुदिन ढवळीकर, जलस्रोत तथा सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, प्रियोळचे आमदार गोविंद गावडे, फोंड्याचे नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर, राजीव गांधी कला मंदिरचे अध्यक्ष रितेश रवी नाईक, जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, प्रीतेश गावकर, गौरी शिरोडकर, सरपंच नावेद तहसीलदार व अन्य उपस्थित होते.
‘डबल इंजिन’ सरकार राज्यातील जनतेच्या सोयीसाठी अनेक सुविधा, त्याचबरोबर जनहिताच्या योजना राबवत आहे. विरोधक ताळमेळ नसलेले आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वच्छतेसाठीही सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. त्याचबरोबर बेरोजगारीवर तोडगा काढण्यासाठी सरकारने बेरोजगारांसाठी खास योजना सुरू केल्या आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
कार्यक्रमात वीजमंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले की, ‘सरकार तुमच्या दारी’ उपक्रमाअंतर्गत गोमंतकीयांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्यात सरकारला यश आले आहे. फोंडा तालुक्यातील जनतेचे प्रश्न, समस्या सुटाव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून ‘सरकार तुमच्या दारी’ उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. सरकारच्या सर्व योजना व उपलब्ध करून देण्यात आलेल्या साधनसुविधा यांचा लाभ जनतेने घेण्याची गरज आहे.

अंत्रुज महाल विकासाच्या बाबतीत नंबर एक करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी लोकांनी सरकारला सहकार्य करण्याची गरज आहे.
_ सुभाष शिरोडकर, जलस्रोत तथा सहकार मंत्री