राज्यात आता चालतात फक्त ५० मीठागरे

बंद मीठागरे सुरू करण्यासाठी सरकारचे प्रयत्न


06th February, 11:55 pm
राज्यात आता चालतात फक्त ५० मीठागरे

मीठागरात काम करताना कर्मचारी. (नारायण पिसुर्लेकर)

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोवा मुक्त झाल्यानंतर राज्यात २०० असलेली मीठागरांची संख्या आता जवळजवळ ५० वर येऊन ठेपला आहे. अलिकडेचे जी मीठागरे बंद पडली आहेत, ती पुन्हा सुरू व्हावीत आणि गोव्यात तयार होणारे मिठाचे उत्पादन वाढावे म्हणून प्रयत्न सुरू आहेत. आगरवाडा, नेरूल, रायबंंदर, भाटी, कुडका आणि केळशी (सासष्टी) याच गावांमध्ये आता हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच मीठागरे शिल्लक राहिली आहेत, अशी माहिती गोवा जैवविविधता मंंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप सरमोकादम यांनी दिली.
मीठागरातील मीठ तयार करणे हा गोमंतकीयांचा पारंपरिक व्यवसाय आहे. पोर्तुगीज काळापासून बार्देश, तिसवाडी, पेडणे, सासष्टी तालुक्यांत हा व्यवसाय चालतो. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला गोव्यात ७०० मीठागरे होती, अशी नाेंद मिळते. त्यानंतर गोवा मुक्तीवेळी ही संख्या २०० वर आली. नंतर ही संख्या आणखी कमी होऊन आता ५० वर पोहोचली आहे.
काही वर्षांपूर्वी मीठागरात तयार झालेल्या मीठाची गावागावांत विक्री केली जात होती. डबा किंवा पायलीच्या मापाने मीठ विक्री केले जात होते. बरेच गोमंतकीय वर्षाला हवे तितके मीठ विकत घेऊन ठेवत होते. आता दुकानातील आयोडिनयुक्त मीठ खरेदी करण्याला लोक पसंंती देत आहेत.
मीठाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर भर
मीठागरातील मीठ काढण्याचा खर्च अधिक आणि विक्री कमी, अशी स्थिती आहे. त्यामुळे या मीठाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावरही भर दिला जाईल. हे मीठ आरोग्याला चांगले असते. त्यामुळे त्याची निर्यातही करणे शक्य आहे. मीठागरांची संख्या वाढवून मीठ उत्पादन वाढवण्यावर सध्या भर आहे.

मीठागरांचे संवर्धन करण्याचे प्रयत्न सुरू : डॉ. सरमोकादम
मीठागरांचे संवर्धन करण्यासह मीठ तयार करण्याचा व्यवसाय वाढण्यासाठी गोवा सरकारने कृती दल स्थापन केले आहे. कृती दलाच्या बैठका सुरू झाल्या आहेत. राज्यात सुरू असलेल्या मीठागरांचा शोध घेऊन त्यांचे संरक्षण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगरवाडा, नेरूल, भाटी आणि कुडका भागात मीठागरे शिल्लक आहेत. त्यासाठी खास केंंद्र सुरू होईल. केंंद्रातर्फे मीठागराचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना आधुनिक तंंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले जाईल, अशी माहिती डॉ. प्रदीम सरमोकादम यांनी दिली.