औषध पुरवठाप्रकरणी फसवणूक; कॉपीराईट संदर्भात गुन्हा दाखल

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : आरोग्य संचालनालयाच्या तक्रारीवरून पोलिसांनी सर्पदंश प्रतिबंधक औषधांचा अवैध पुरवठा केल्यासंदर्भात सांताक्रूझ येथील ‘आरव फार्मा’विरोधात फसवणूक आणि कॉपीराईट संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मूळ कंपनीने सदर बॅचचे औषध २२ मार्च २०२५ रोजी बिहार सरकारला पुरवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळणार आहे.
आरोग्य संचालनालयाने २००० इंजक्शन सर्पदंश प्रतिबंधक औषध पुरवठा करण्यासाठी १८ डिसेंबर २०२५ रोजी निविदा जारी केली होती. त्यानुसार, औषध तयार करणारी तेलंगण येथील कंपनी विन्स बायोप्रोडक्ट्स लिमिटेडचे अधिकृत पुरवठाधारक शेल हेल्थकेअर, फार्मास्युटिकल डिस्ट्रिब्युटर्स अँड इन्स्टिट्युशनल सप्लायर्स, बांबोळी आणि सांताक्रूझ येथील ‘आरव फार्मा’ कंपनीने निविदेत भाग घेतला. आरव फार्माची किंमत कमी असल्यामुळे संचालनालयाने २९ डिसेंबर २०२५ रोजी त्यांना २००० इंजक्शन सर्पदंश प्रतिबंधक औषध पुरवठ्याचे कंत्राट दिले. आरव फार्माने २ जानेवारी २०२६ रोजी हिसार येथील अमृत फार्मा कंपनीकडून वरील इंजक्शन खरेदी केले. ठरल्याप्रमाणे आरव फार्माने ८ जानेवारी २०२६ रोजी आरोग्य संचालनालयाला सर्पदंश प्रतिबंधक औषधाचे १,०८२ इंजक्शन पुरवठा केला. याच दरम्यान मूळ कंपनी विन्स बायोप्रोडक्ट्स लिमिटेडला त्यांची निविदा बाहेर पडल्याचे कळाले. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गोव्यात येऊन चौकशी केली. त्यावेळी कंपनीच्या नावाने आरव फार्माने आरोग्य संचालनालयाला वरील इंजक्शन पुरवठा केल्याचे कळाले. मूळ कंपनीने याबाबत आरोग्य सेवा संचालनालयाच्या मेडिसीन विभागाचे उपसंचालक डॉ. सहीन सईद याच्याकडे तक्रार दाखल करून कंपनीने आरव फार्माला वरील इंजक्शन पुरवठा केला नसल्याची माहिती दिली. तक्रार मिळाल्यानंतर आरोग्य संचालनालयाने वरील इंजक्शनचा पुरवठा स्थगित करून चौकशी सुरू केली. याच दरम्यान आरोग्य संचालनालयाने आणि अन्न व औषध प्राधिकरणाने सांताक्रूझ येथील आरव फार्माच्या आस्थापनांची तपासणी केली. मूळ कंपनीने वरील प्रकरणी या संदर्भात ३० जानेवारी २०२६ रोजी पणजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
समान बॅचचे औषध बिहारला पाठवल्याचे स्पष्ट
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, मूळ कंपनीने सर्पदंश प्रतिबंधक औषधाचे वरील समान बॅचचे ८,६०० इंजक्शन २२ मार्च २०२५ रोजी बिहार सरकारला पुरवठा केल्याचे समोर आले आहे. कंपनीने हे इंजक्शन बिहार राज्य वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन, मुझफ्फरपूर येथे दिले होते.
अटकपूर्व जामीन अर्ज दाखल
दरम्यान, ‘आरव फार्मा’ कंपनीचे भागीदार उपेंद्रकुमार सिंग यांनी मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे.