त्या माणसाचा दृष्टिकोन आता पूर्ण बदलला होता. ज्या प्रॉपर्टीसाठी त्याने स्वतःचं आयुष्य पणाला लावलं, ती आता त्याला क्षुल्लक वाटत होती. त्याला आता बिल्डर व्हायचं नव्हतं, त्याला फक्त 'जगायचं' होतं. हलकं होऊन, ओझं उतरवून.

नेफ्रोलॉजी ओपीडीच्या त्या पांढऱ्या भिंतींमध्ये नेहमीच एक वेगळाच शांतपणा आणि भीतीचा संमिश्र दर्प असायचा. मी आणि माझे मित्र हातात वह्या घेऊन, सरांच्या अवतीभोवती उभे होतो. आमच्या डोक्यात नेफ्रोलॉजीची ती अवघड समीकरणं, क्रिएटिनिनचे आकडे आणि डायलिसिसचे निकष फिरत होते. आमच्यासाठी तो फक्त 'पुढचा पेशंट' होता, पण सरांसाठी मात्र तो एक उलगडणारं पुस्तक होतं.
समोरच्या खुर्चीवर एक माणूस बसला होता. वय जेमतेम चाळीशी, पण चेहऱ्यावर साठ वर्षांचा थकवा. मानेच्या शिरेत बसवलेला डायलिसिसचा कॅथेटर त्याच्या हतबलतेची साक्ष देत होता. हातावर फिस्टुलाच्या शस्त्रक्रियेच्या खुणा एखाद्या जुन्या जखमेसारख्या दिसत होत्या.
सरांनी रिपोर्टवर नजर टाकली आणि आपल्या खास शैलीत विचारलं, "अरे रे रे... काय गोंधळ घातलास?"
तो 'गोंधळ' हा शब्द सरांचा ट्रेडमार्क होता. त्या एका शब्दात अधिकार होता, पण त्यापेक्षा जास्त माणुसकी आणि आधार होता. तो माणूस क्षणभर थांबला, त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्या आयुष्याची विखुरलेली पानं आमच्यासमोर मांडायला सुरुवात केली.
"सर, दिल्लीत एक मोठी प्रॉपर्टी बघितली होती. बिल्डर व्हायचं स्वप्न होतं," तो सांगू लागला. त्याच्या डोळ्यांसमोर कदाचित त्या टोलेजंग इमारती उभ्या राहत असाव्यात. "माझं जे काही होतं, ते सगळं तिथे लावलं. जीव ओतला त्यात. पण अचानक लीगल अडचणी आल्या. कोर्टाच्या पायऱ्या, वकील, धावपळ आणि रोजचा तो मानसिक त्रास..."
आम्ही तिथे उभे राहून विचार करत होतो... डायबिटीज? हायपरटेन्शन? पेनकिलर्सचा अतिवापर? पण त्याचं उत्तर कोणत्याही लॅब रिपोर्टमध्ये नव्हतं.
"पाच वर्ष सर... पाच वर्ष मी स्वतःला विसरलो. टेन्शन असायचं, पण मी ते मनातच दाबून ठेवलं. थकवा यायचा, पण 'वेळ नाही' म्हणून त्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. आणि एके दिवशी अचानक पाय सुजले. डॉक्टरांकडे गेलो, तर बीपी २०० च्या वर होतं आणि किडन्यांनी साथ सोडली होती."
बोलता बोलता त्याच्या डोळ्यात पाणी आलं. ते पाणी फक्त आजाराचं नव्हतं, तर गमावलेल्या वेळेचं आणि चुकीच्या प्राधान्यक्रमाचं होतं. तो रडत होता आणि आम्ही सुन्न होऊन ऐकत होतो.
त्या दिवशी आम्हाला एका वेगळ्याच सत्याची जाणीव झाली. हॉस्पिटलच्या त्या पांढऱ्याशुभ्र भिंती आणि औषधांच्या वासात आम्हाला समजलं की, हे शरीर म्हणजे केवळ एक 'भाड्याचं घर' आहे. आपण आयुष्यभर या घराला नानाविध रंगांनी रंगवतो, सुखाच्या साधनांनी सजवतो आणि त्याच्या सौंदर्यावर विनाकारण अभिमान बाळगतो; पण आपण सोयीस्करपणे हे विसरतो की हे घर कायमस्वरूपी आपलं नसून ते काही काळासाठीच निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे. जेव्हा या घराचे खांब कमकुवत होऊ लागतात आणि छत कोसळायला लागतं, तेव्हा कुठेतरी आपल्याला साक्षात्कार होतो की, ज्या संपत्तीच्या आणि प्रतिष्ठेच्या मागे आपण अहोरात्र धावत होतो, ती या घराच्या साध्या दुरुस्तीसाठीही अपुरी पडते.
त्या माणसाचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता पूर्णपणे बदलला होता. ज्या जमिनीच्या तुकड्यांसाठी आणि प्रॉपर्टीसाठी त्याने आपलं रक्त आटवलं, स्वतःचं सुख आणि आरोग्य पणाला लावलं, ती सर्व माया आता त्याला क्षुल्लक आणि मातीमोल वाटत होती. मृत्यूच्या उंबरठ्यावर उभं असताना त्याला आता मोठा बिल्डर होऊन इमारती उभारायच्या नव्हत्या, तर त्याला उरलेला प्रत्येक श्वास अर्थपूर्णपणे 'जगायचा' होता. मनावर साठलेलं अहंकाराचं ओझं उतरवून त्याला अगदी हलकं व्हायचं होतं.
आम्ही वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी, स्टेथोस्कोप गळ्यात घालून सरांच्या मागे दुसऱ्या पेशंटकडे गेलो खरे, पण आमचं मन मात्र त्या माणसाच्या बेडपाशीच अडकून पडलं होतं. नेफ्रोलॉजीच्या वह्यांमध्ये आम्ही कदाचित किडनीच्या व्याधीची तांत्रिक लक्षणं आणि औषधोपचार टिपले असतील, पण प्रत्यक्षात 'जगण्याचं' खरं निदान त्या माणसाने आपल्या एका वाक्यात करून दिलं होतं. त्याने आम्हाला शिकवलं की शरीर थकू शकतं, पण आत्म्याला लागलेली साचलेपणाची ओढ वेळीच ओळखता आली पाहिजे.
धावण्यात आणि कमावण्यात कदाचित सुख असेलही, पण खरं समाधान हे 'सोडून देण्यात' आहे. वेळीच थांबता आलं, स्वतःच्या श्वासांकडे लक्ष देता आलं आणि मनावरचं ओझं उतरवता आलं, तरच हे 'भाड्याचं घर' सुखाचा निवास ठरू शकतं.
तो माणूस ओपीडीतून बाहेर पडला, पण जाताना आम्हा भावी डॉक्टरांना एक मोठा धडा देऊन गेला... "जगण्याचं ओझं करू नका, फक्त जगायला शिका.”

डॉ. अनिकेत मयेकर