भारतीय रेल्वे : रोजगाराची आणि विकासाची महावाहिनी

​ऐतिहासिक वारसा लाभलेली भारतीय रेल्वे आज जगातील सर्वात मोठ्या नियोक्तांपैकी एक आहे. विविध शैक्षणिक स्तरांनुसार उपलब्ध असणाऱ्या नोकरीच्या संधी, भरती प्रक्रिया आणि रेल्वेतील करिअरचे उज्ज्वल भवितव्य यावर प्रकाश टाकणारा हा लेख.

Story: यशस्वी भव: |
24th January, 11:21 pm
भारतीय रेल्वे : रोजगाराची  आणि विकासाची महावाहिनी

साधारण १८५३ च्या सुमारास ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड डलहौसी यांनी सर्वप्रथम भारतामध्ये रेल्वे सुरू करावी असा प्रस्ताव ब्रिटिश पार्लमेंटकडे मांडला व त्यानंतर रेल्वेचा विस्तार भारतात झाला. (टीप: भारतात पहिली रेल्वे १८५३ मध्ये धावली). त्यावेळी हजारो कोटी रुपये या योजनेसाठी देण्यात आले. ही रेल्वे भारतात कशी धावू लागली हा फारच रंजक इतिहास आहे. सुरुवातीला लोक एक 'चेटूक' म्हणून रेल्वेगाडीला चक्क दगड मारत असत व नंतर त्याच रेल्वेमधून मिरवू लागले. अनेक जण या रेल्वे बांधणीमध्ये हुतात्मा सुद्धा झाले. बोगदे तयार करणे, पूल बांधणी या कामांत अनेक मोठे मोठे अपघात देखील झालेले आहेत. आपण आता सहजपणे रेल्वेतून प्रवास करतो, परंतु कित्येक जीवांच्या बलिदानाने आपण हे सुख उपभोगत आहोत, हे ध्यानात घेणे गरजेचे आहे. 'रेल्वे ही स्वातंत्र्यसंग्रामाची वरदायिनी' असे उद्‌गार त्यावेळी लोकमान्य टिळकांनी काढले होते. याचे कारण असे की, यामुळेच भारताचे विविध प्रदेश एकमेकांच्या जवळ आले व त्याचा स्वातंत्र्यासाठी फायदा झाला. हा झाला इतिहासाचा भाग.

​आजमितीस रेल्वे विभागात सुमारे १५ लाख लोक काम करतात. दर महिन्याला हजारो तरुण रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाच्या (RRB) परीक्षांना सामोरे जातात. कित्येक जण रेल्वेमध्ये काम सुरू करतात, तर रोज अनेक लोक रेल्वेमधून निवृत्त (Retire) देखील होत असतात.

​भारत सरकारच्या अंतर्गत 'रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड' (RRB) ही संस्था रेल्वेमधील कर्मचारी भरतीचे काम पाहते. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी २१ RRB आहेत व त्या त्या विभागातील उपलब्धतेनुसार (Employment Availability) उमेदवार निवडले जातात.

​१० वी पासून पदव्युत्तर (Post Graduate) शिक्षण घेतलेला कोणताही विद्यार्थी रेल्वेमध्ये सहभागी होऊ शकतो. रेल्वे प्रशासन मूलभूतपणे ४ विभागांवर चालते:

​१) तांत्रिक विभाग (Technical Section): यामध्ये डबे बनवणे, इंजिन तयार करणे, रेल्वे रुळ टाकणे, इलेक्ट्रिक लोको शेड, रेल्वे स्टेशनची उभारणी इत्यादी कामे चालतात. यासाठी डिप्लोमा होल्डर्स (Diploma Holders) मोठ्या प्रमाणात निवडले जातात. BE/B.Tech/Diploma (Mechanical, Electrical, Civil, Automobile, Electronics/IT) असे अनेक अभियंते येथे नियुक्त केले जातात.

​२) बिगर-तांत्रिक विभाग (Non-Technical Section): यामध्ये तिकीट कलेक्शन, लीगल सिस्टम, HR, पर्चेस, मटेरिअल, डॉक्टर्स, नर्सेस, रेल्वे क्वार्टर्स योजना, कॅन्टीन इत्यादी कामांसाठी कर्मचारी निवडले जातात. यासाठी BA, B.Com, B.Sc, B.Pharma, १० वी, १२ वी, पॉलिटेक्निक आणि ITI मधील सर्व ट्रेडचे उमेदवार घेतले जातात.

​३) वित्त आणि लेखा विभाग (Finance/Accounts): हा विभाग रेल्वे महसूल, भागभांडवल, फायनान्शिअल बाँड्सचे वितरण, निर्मिती व नियोजनाचा भाग पाहतो. B.Com, M.Com, CA, CS, ICWA, LLB, LLM, टॅक्स कन्सल्टंट असे अनेक उमेदवार येथे काम करतात.

​४) पोलीस विभाग (RPF): रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) या विभागात संरक्षणासाठी उमेदवार निवडले जातात. १० वी पासून पदवीधरांपर्यंत कोणीही येथे अर्ज करू शकतो.

​निवड प्रक्रिया:

RRB च्या प्रवेश परीक्षा असतात. परीक्षेसाठी १० वी स्तरावरील सामान्य विज्ञान (General Science), गणित, चालू घडामोडी (Current Affairs), सामान्य ज्ञान (General Knowledge) आणि जनरल अॅप्टिट्यूड (General Aptitude) असे विषय असतात. परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार मुलाखतीतून (Interview) निवडले जातात. 'एम्प्लॉयमेंट न्यूज' (Employment News) या वृत्तपत्रातून या परीक्षांच्या जाहिराती सतत येत असतात. तसेच रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरूनही वारंवार माहिती मिळते. गुगलवर सर्च केल्यास संपूर्ण माहिती उपलब्ध होते.

​केंद्र सरकारी नोकरी, पेन्शन, आकर्षक वेतन तसेच आगामी मेट्रो प्रोजेक्ट्स व आधुनिकीकरणामुळे रेल्वेमध्ये एक आव्हानात्मक आणि भक्कम करिअर घडवण्याची संधी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


अॅड. शैलेश कुलकर्णी,
कुर्टी - फोंडा
(लेखक नामांकित वकील आणि करिअर समुपदेशक आहेत.)