निसर्गातील प्राणी स्वतःचे संरक्षण, संवाद आणि वाढीसाठी रंग बदलणे किंवा कात टाकणे यांसारख्या प्रक्रियांचा वापर करतात. सरड्याचा रंगबदल आणि सापाची कात यांमागील शास्त्रीय कारणे व त्यांचे महत्त्व.

‘रंग बदल रे, टोमॅटो पटापट लाल बनव रे”, ही टोमॅटो सॉसची जाहिरात आपण सगळ्यांनी बघितलीच असेल. जिथे प्रत्युत्तरात शेतकरी सरड्याला म्हणतो की, “कुणी सरड्याची शपथ घेतली असेल तरच रंग बदलेल. आमचा टोमॅटो सॉस रंग नाही बदलणार कारण तो अस्सल टोमॅटोपासून बनला आहे.” अशा आशयाची ती जाहिरात. पण खरंच सरडा रंग बदलतो? जर तसे असेल तर का बरं तो रंग बदलत असेल? ‘सापाभाशेन मरे तू, आपली खरी कात दाखयना’, ‘सरड्याप्रमाणे रंग नको रे बदलू’ अशा आशयाच्या म्हणी देखील प्रसिद्ध आहेत. अशा प्रकारची सुभाषिते पडण्यामागची कारणे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया.
निसर्गामध्ये अनेक वन्यप्राणी स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी वेगवेगळ्या जैविक प्रक्रिया वापरत असतात. कात टाकणे, शरीराचा रंग बदलणे या दोन अतिशय महत्त्वाच्या नैसर्गिक प्रक्रिया आहेत. या प्रक्रियांमुळे प्राण्यांना वाढ, संरक्षण, संवाद आणि पर्यावरणाशी जुळवून घेणे शक्य होते. काही वन्यप्राणी परिस्थितीनुसार आपल्या शरीराचा रंग किंवा छटा बदलतात, तर अनेक वन्यजीव कात (त्वचा) टाकतात. ही प्रक्रिया केवळ सौंदर्यासाठी नसून जगण्यासाठी अत्यंत आवश्यक अशी जैविक यंत्रणा आहे.
त्वचेचा रंग बदलणारा सर्वात प्रसिद्ध प्राणी म्हणजे सरडा. हा प्राणी परिस्थिती, भावना व तापमानानुसार रंग बदलतो. सरडा आपल्या आसपासच्या वातावरणाशी रंग जुळवून घेत असतो. वातावरणानुसार तो पाने, पालापाचोळा, झाडाच्या खोडाचा रंग परिधान करतो, जेणेकरून पक्षी, साप यांसारखे शत्रू त्याला सहजरित्या शोधू शकणार नाहीत. त्याच्या रंग बदलण्यामागे अनेक कारणे असू शकतात. तणावामुळे किंवा भीतीपोटी सरडा रंग बदलतो. इतकेच नव्हे तर सरड्याचा रंग त्याच्या 'मूड'वरही अवलंबून असतो. मादीला आकर्षित करायचे असल्यास तो रंग बदलतो. हा प्राणी थंड हवामानात सूर्यप्रकाश शोषून शरीर उबदार ठेवण्यासाठी गडद किंवा काळा रंग धारण करतो, तर उष्ण हवामानात शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी फिकट रंग धारण करतो. स्वतःचे क्षेत्र दर्शवण्यासाठी किंवा इतर सरड्यांशी संवाद साधण्यासाठीही सरडा रंग बदलत असल्याचे संशोधन सांगते.
अनेक प्राणी शत्रूपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी अवयव त्याग करतात. आश्चर्य म्हणजे हा त्याग केलेला अवयव काही दिवसांनंतर पुन्हा जीवित होतो. उदा. शत्रूपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पाल आपली शेपटी त्यागते. काही आठवड्यांनंतर पालीला नवीन शेपूट वाढते. काही प्राणी असेही असतात जे जुने शरीर घट्ट होते म्हणून कवच किंवा त्वचा टाकतात, जसे की खेकडा किंवा साप. खेकड्याचे बाह्य कवच शरीरासोबत वाढत नाही. स्वतःची वाढ व्हावी यासाठी खेकडा जुने कवच टाकतो आणि नवीन कवच धारण करतो. खेकड्याच्या शरीराचा आकार वाढला की जुने कवच घट्ट होऊ लागते. अशा वेळी खेकडा आपल्या जुन्या कवचातून बाहेर पडतो. नवीन कवच मऊ असेपर्यंत शत्रूंपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी खेकडा सुरक्षित ठिकाणी किंवा वाळूत लपून बसतो. कधी काळी जर त्याची एखादी नांगी तुटली असेल, तर कवच टाकण्याच्या प्रक्रियेत त्याला नवीन नांगी मिळते. त्याचप्रमाणे साप. सापांच्या वाढत्या शरीरासाठी जुनी त्वचा लहान पडते. ती बदलून नवीन, लवचिक त्वचा धारण करण्यासाठी साप कात टाकतात. शरीरावरून जुनी त्वचा काढून टाकल्याने त्याच्या शरीरावरील परजीवीही दूर होतात. इतकेच नव्हे तर त्वचेवर काही जखमा किंवा डाग असल्यास, ते देखील या प्रक्रियेत निघून जातात. पूर्ण वाढ झालेले साप वर्षातून ३ ते ४ वेळा कात टाकतात. सिसाडा, कीटक, कोळी, बेडूक, काही पक्षी, गेको, चतुर यांसारखे वन्यजीव देखील कात टाकतात. कात टाकणे व रंग बदलणे या जरी स्वतंत्र प्रक्रिया असल्या तरी दोन्ही प्रक्रिया पर्यावरण संतुलन व परिसंस्था संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात.

स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)