धालो उत्सवाची सांगता आणि समृद्ध परंपरा

पौष महिना म्हणजे सुगीचा महिना. ह्या सुगीच्या महिन्यात आपला आनंद व्यक्त करता करता अमावस्येपर्यंत प्रत्येक गावामध्ये आपल्या वेळेनुरूप आपल्या गावातील प्रथेनुरूप धालो खेळला जातो. पहिल्या रात्रीपासून पाच रात्री हा खेळ खेळत सकाळी त्याची सांगता होते.

Story: भरजरी |
24th January, 11:16 pm
धालो उत्सवाची सांगता आणि समृद्ध परंपरा

रात्री कामधाम आटोपून धालोच्या मांडावर जमलेल्या नारी मध्यरात्रीपर्यंत धालो खेळतात. पाचव्या रात्री सबंध रात्र जागरण करतात. तऱ्हेतऱ्हेच्या फुगड्या, खेळ गाणी ज्यांच्या मैफिलीत सकाळ कधी होते याचा पत्ता लागत नाही. सकाळी पुन्हा न्हाऊन धुवून सगळ्या स्त्रिया मांडावर हजर. ही सकाळ सुरू होते ती पिंगळीच्या घंटीच्या आवाजाने. 

महाराष्ट्रात ज्याप्रमाणे वासुदेव येण्याची पद्धत होती, गोव्याच्या आणि कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांच्या सीमावर्ती गावामध्ये पिंगळी येण्याची प्रथा होती. आज ती प्रथा जवळपास लुप्त झाली असली, तरी धालो खेळताना त्याचे एक सोंग घेतले जाते, यावरून पिंगळीच्या अस्तित्वाची कल्पना येते. 

गावातील एखादी मुलगी पारंपरिक वेशभूषा करून पिंगळी होते. त्यानंतर ती गावातील प्रत्येक घरी जाते. तिथे तिची पूजा केली जाते. तिला काही पैसे दिले जातात. अशाप्रकारे पूर्ण गाव फिरल्यानंतर पिंगळी पुन्हा मंदिराच्या किंवा मांडाच्या आवारात येतो. पिंगळी फिरताना घरणीबाई गाते...

सकाळचे पाराला गे
पिंगळी आले दराला गे
आमी पिंगळी पर्याचे
तांदुळ खातुय वरयाचे

पिंगळी फिरून झाल्यावर सावज मारण्याचा अजून एक खेळ मांडावर खेळला जातो. पूर्वी सावज मारणे किंवा शिकार करणे हे फक्त मनोरंजनासाठी नसून, ती एक प्रथा होती. गाव रक्षणासाठी जंगलातील एखादे सावज मारून जंगलातील प्राण्यांना गावाच्या वेशी आत न येण्यासाठी दिली जाणारी तंबी होती. ही शिकार सुद्धा जाणत्या माणसाकडून मुहूर्त घेऊन त्या मुहूर्तावरच केले जाई.

सावज मारल्यानंतर बायका पुन्हा मांडावर पाती धरून उभ्या राहतात. पाचही रात्री गायली जाणारी गीते पुन्हा गातात. शेवटी धाल्याची सांगता करतात. सांगता करताना पुन्हा वनदेवीला हाक मारताना म्हणतात,

तळ्यातली काणय तळ्यातली काणय
तळा भोवता गे काणय तळा भवता
वनदेवता माय मांडार येता
माय धालो खेळता गे माय धालो खेळता

यानंतर अजून एक सगळ्यात महत्त्वाचा विधी म्हणजे मांड शिंपणे. गावातील गावकर महिला नदीवर घागर कळशी घेऊन जाते. विधिवत नदीवरील पाणी आणते. ते पाणी सबंध खळेभर शिंपडते. त्याच कळशीतील पाणी तीर्थ म्हणून उपस्थित असलेल्या सर्व भाविक महिलांना देते. ज्याप्रमाणे गावकर महिला हा मांड शिंपतात; त्याचप्रमाणे काही गावात अशा महिला सुद्धा तिच्या मागो माग मांड शिंपतात ज्यांना मूल होत नाही. सत्तरी तालुक्यातील येथील मासोर्डे ह्या गावी ही प्रथा आहे. ज्या ज्या भाविकांनी आजवर आपल्याला मूल होऊ दे म्हणून हा मांड शिंपलेला आहे, त्या त्या भाविक स्त्रीच्या पदरात वनदेवीने मूल घातले आहे ही आजपर्यंत आलेली प्रचिती आहे.

पोटाच्या पुत्रसाठी गोरयेन
नवस आंगयला
गोरयेन नवस आंगयला
दरातला चंदन गोरयेन
दुकान शिंपिला
गोरयेन हसत शिंपीला

मांड शिंपण्याच्या वेळी वरील ओवी ऐकताना उपस्थित महिलांना हुंदका फुटला नाही तर नवल.

मांड शिंपून झाल्यानंतर मांड शेणाने सारवला जातो. त्यावेळी प्रत्येकाच्या हातामध्ये नारळाच्या खोबऱ्याचा एक एक तुकडा दिला जातो. गावकर स्त्री शेण कालवते. अशावेळी इतर स्त्रिया हा तुकडा आपल्या अंगाभोवती फिरवून त्या शेणात टाकतात, जर आपल्यावरील काही किरी मारी असेल तर त्या तुकड्याच्या रूपात ओवाळून टाकली जाते.

शेण कालयता शेण कालयता
शेणात पडले किडे शेणात पडले किडे
मासोर्डे गावचे चेडे
शांतादुर्गेचे मेडे
शांतादुर्गेचे मेडे 

शेण कालवताना आजूबाजूच्या सगळ्या देवदेवतांची नावे घेऊन त्यांचे आभार मानले जातात. त्यानंतर डिमी धरण्याचा हा मजेशीर खेळला जातो, ज्यात गावातील सुना मुलींना डीमी घालून बसण्याची अट घातली जाते.

आयकु बायकुल्यो
दोगी मिळाल्यो
एक नार पाण्यक जाय
नाल हेले चोरांनी
उठ गे बायकुले
भावाचे भयानुले
बापागेले पाच घोडे
मावळ्यागेले सात घोडे
बारा घोड्याक पुजेक लाया
सगळ्या बायालाक फुला माळा
सगळ्या बायलाचे घोवले म्हणती
म्हापशाकार चौगुले
भावाचे भयनुले
डीमी मोड गे
भावाचे भयनुले
डीमी मोड गे

नादमय असे हे गाणे म्हणताना एक उल्हासित वातावरण तयार होते. असे खेळीमेळीचे वातावरण तयार झाल्यानंतर धालो थांबवण्याचे गीत सुरू होते...

धालाच्या मांडार
शेणाचो कालो
आयचान धालो निभावलो
श्री धालो गे श्री धालो गे 

वनदेवते माय तूजो
खेळ खेळयलो
खेळ खेळयलो
तसो मांड थरयलो
श्री धालो गे श्री धालो गे

सर्व देव देवतांचे आभार मानून धालो हा पाच दिवसाच्या महिलांचा उत्सव संपन्न होतो. हा पूर्ण उत्सव मांडावर बांधलेल्या तुळशीच्या मध्यवर्ती फिरत असतो. ही तुळस म्हणजेच वनदेवीचे प्रतीक. मांड थांबवल्यानंतर त्या तुळशीपुढे आपल्या मनातील गाऱ्हाणी, साकडे घालून तिची ओटी भरतात. प्रसाद म्हणून गुळ-खोबरे वाटतात. 

पौष महिना म्हणजे सुगीचा महिना. ह्या सुगीच्या महिन्यात आपला आनंद व्यक्त करता करता अमावस्येपर्यंत प्रत्येक गावामध्ये आपल्या वेळेनुरूप आपल्या गावातील प्रथेनुरूप धालो खेळला जातो. पहिल्या रात्रीपासून पाच रात्री हा खेळ खेळत सकाळी त्याची सांगता होते. पूर्ण वर्षभराची राखण आपल्यासाठी, आपल्या परिवारासाठी घेत घरणीबाई पुन्हा आपल्या रोजच्या कामकाजाला लागते. 


गाैतमी चाेर्लेकर गावस