दोन विषयांत दहा टक्के गुण मिळाले तरी दहावी होता येणार उत्तीर्ण

‌शालान्त मंडळाचे परिपत्रक : गुणांची कॉम्पेसेशन योजना यंदापासून


21st January, 11:53 pm
दोन विषयांत दहा टक्के गुण मिळाले तरी दहावी होता येणार उत्तीर्ण

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : इयत्ता दहावीच्या परीक्षेला अन्य विषयांत उत्तीर्ण आणि दोनच विषयांत फक्त दहा टक्के गुण मिळाले तरी संबंधित विद्यार्थ्याला गुणांची कॉम्पेसेशन योजना लागू करून दहावी उत्तीर्ण केले जाईल. यंदापासून या कॉम्पेसेशन योजनेची अंमलबजावणी सुरू केली जाईल, असे परिपत्रक शालान्त मंडळाने जारी केले आहे. त्यामुळे ८० गुणांच्या परीक्षेत ८, तर ७० गुणांच्या परीक्षेत फक्त ७ गुण मिळणे आवश्यक आहे.


यापूूर्वी उत्तीर्ण होण्यासाठी ८० गुणांच्या परीक्षेत १७, तर ७० गुणांच्या परीक्षेत १५ गुण मिळणे आवश्यक होते. आता काॅम्पेसेशन योजनेनुसार, दोन विषयांत १० टक्के गुण मिळाले तरी चालणार आहे. संबंधित विद्यार्थी उत्तीर्ण होत असल्यासच त्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेट्ये यांनी दिली.
राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामुळे इयत्ता नववी व दहावीच्या अभ्यासक्रमात बदल झाला आहे. या पार्श्वभूमीवर शालान्त मंडळाने दहावीच्या परीक्षेविषयी मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक जारी केले आहे. त्यात कॉम्पेसेशन योजनेविषयी स्पष्टीकरण दिले आहे. ही योजना फक्त मुख्य सहा विषयांनाच लागू होईल. कौशल्य आधारित विषय (स्कील बेसड) वा विद्यालयीन मूल्यमापन विषयांना ही योजना लागू होणार नाही. यंदा इयत्ता दहावीला तीन भाषा (इंग्लिश, हिंदी, मराठी/कोकणी) आणि समाजशास्त्र (सोशल सायन्स), विज्ञान (सायन्स) आणि गणित (मॅथेमॅटिक्स) हे सहा मुख्य विषय आहेत. यापैकी एखादा विद्यार्थी दोन विषयांत नापास झाला तर कॉम्पेसेशेन योजनेद्वारे तो उत्तीर्ण होऊ शकतो. यासाठी त्याला दोन विषयांत कमीतकमी १० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. इंग्लिश, हिंदी, मराठी/कोकणी, समाजशास्त्र आणि गणित या विषयांची परीक्षा ८० गुणांची असते. या विषयांत दहा टक्के म्हणजे कमीतकमी ८ गुण मिळणे आवश्यक आहे. विज्ञानाची परीक्षा ७० गुणांची असते. या विषयात कमीतकमी ७ गुण मिळणे आवश्यक आहे.
प्रात्यक्षिक परीक्षेसाठीही योजना लागू
कौशल्यावर आधारित चार विषय आहेत. त्यापैकी दोन विषयांत ६५ टक्के आणि अन्य दोन विषयांत ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. प्रात्यक्षिक परीक्षेलाही ही योजना लागू असेल. विज्ञानात २० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा आहे. त्यापैकी १० टक्के म्हणजे २ गुण मिळाले तरी कॉम्पेसेशन योजनेचा लाभ विद्यार्थ्याला मिळू शकतो.
कौशल्य आधारित दोन विषयांचे पेपर मंडळ काढणार
दहावीला इंटर डिसिप्लनरी एरिया (आयडीए), व्होकेशनल (एनएसक्यूएफ), आर्ट एज्युकेशन (कला शिक्षण) आणि फिजिकल एज्युकेशन (शारीरिक शिक्षण) हे चार कौशल्यावर आधारित विषय आहेत. यापैकी फिजिकल एज्युकेशन आणि व्होकेशनल विषयांचे लेखी पेपर शालान्त मंडळ काढणार आहे. आयडीए आणि आर्ट एज्युकेशन पेपर विद्यालये काढतील, असेही शालान्त मंडळाने कळवले आहे.