कचरा व्यवस्थापन न करणाऱ्या पंचायतींना ठोठावणार दंड

प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निर्णय


14 mins ago
कचरा व्यवस्थापन न करणाऱ्या पंचायतींना ठोठावणार दंड

प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : कचरा एकत्र न करणारे, कचऱ्याचे व्यवस्थापन न करणाऱ्या पंचायतींना पर्यावरण नुकसानभरपाईसाठी दंड ठोठावला जाईल. याबाबतचे नियम तयार केले जात आहेत, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष लेविन्सन मार्टिन्स यांनी दिली. पणजीत मंगळवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंडळाच्या सदस्य सचिव डॉ. गीता नागवेकर व इतर अधिकारी उपस्थित होते.
कचरा एकत्र केल्यानंतर तो उचलण्याची व्यवस्था आहे. साळगाव प्रकल्पात कचऱ्यावर प्रक्रिया होते. ज्या पंचायती कचरा एकत्र करत नाहीत, त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव आहे, असे मार्टिन्स म्हणाले. सप्टेंबर २०२५ नंतर मंडळाकडे ध्वनिप्रदूषणाच्या ६०० तक्रारी आल्या. त्यापैकी २२ तक्रारींवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. मंडळाकडे ३८ ठिकाणी ध्वनीचे मापन करण्याची यंत्रणा आहे. आवाजाचे प्रमाण वाढल्यास पहिल्यावेळी २० हजार, दुसऱ्यावेळी ४० हजार आणि नंतर १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. आवाजाचे प्रमाण वाढले वा रात्री संगीत चालूच ठेवल्यास ८९५६४८७९३८ या क्रमांकावर कॉल करून तक्रार करावी. तक्रारीनंतर मंडळातर्फे नजीकचे पोलीस स्थानक आणि उपजिल्हाधिकाऱ्यांना कारवाईविषयी इ-मेल पाठवला जाईल.
चार ठिकाणी हवा प्रदूषणाचे प्रमाण मध्यम
२०२५ मध्ये वास्को, बायणा, डिचोली आणि कुंडई येथे हवा प्रदूषणाचे प्रमाण मध्यम स्वरूपाचे होते. मंडळातर्फे १८ ठिकाणी हवा प्रदूषणाचे मोजमाप केले जाते. उर्वरित १४ ‌ठिकाणी हवा प्रदूषणाचे प्रमाण कमी आहे. आमोणा येथील पीग आयर्न प्रकल्पामुळे बेतकी, खांडोळा आणि आमोणा येथे ग्राफाईटचे कण सर्वत्र पसरतात. ते का पसरतात याचा शोध घेऊन उपाय याेजण्याची प्रक्रिया सुरू आहे, असेही लेविन्सन मार्टिन्स यांनी सांगितले.