माहिती आणि प्रसिद्धी खाते अनभिज्ञ; तक्रार ई-मेलद्वारे पाठवण्याचे आवाहन

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : आरटीआयच्या संकेतस्थळात (वेबसाईट) तांत्रिक बिघाड झाल्याने लोकांची गैरसोय होत आहे. अर्ज केल्यानंतर ‘एरर’ येते. त्यामुळे अर्ज दाखल करता येत नाही. अनेक दिवस हा बिघाड तसाच आहे. याबाबत माहिती आणि प्रसिद्धी खात्यातील अधिकाऱ्यांना कल्पना नसल्याचे तक्रारीविषयी फोन केला असता लक्षात आले.
आरटीआय व्यवहार पेपरलेस करण्याच्या हेतूने सरकारने आरटीआयची वेबसाईट सुरू केली. वेबसाईटवरून आरटीआय अर्ज दाखल करणे सोपे झाले होते. या वेबसाईटमध्ये गंभीर तांत्रिक त्रुटी असल्यामुळे लेखी तक्रारी दाखल कराव्या लागत आहेत. वेबसाईटवर मोबाईल आणि ई-मेलची नोंदणी केल्यानंतर नाव, पत्ता आणि अन्य तपशील घालून विचारायचा प्रश्न अपलोड करावा लागतो. १० रुपयांचे शुल्क भरल्यानंतर एका महिन्यात आवश्यक ती माहिती मिळते. माहिती अपेक्षित अशी न मिळाल्यास पहिले आणि दुसरे अपीलही वेबसाईटवरून करता येते. सध्या सर्व प्रक्रियेनंतर शुल्क भरताना पेमेंट पर्यायावर क्लिक केल्यानंतर ‘एरर’ येते. भलताच कोड असलेली वेबसाईट येते आणि नंतर पुढे काहीच होत नाही. वरचेवर प्रयत्न करूनही ही प्रक्रिया पूर्ण होत नाही.
माहिती आणि प्रसिद्धी खात्याकडे राज्याच्या आरटीआय वेबसाईटच्या देखरेखीची जबाबदारी आहे. याविषयी खात्याच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला असता, त्यांना या समस्येविषयी काहीच कल्पना नसल्याचे लक्षात आले. ही वेबसाईट नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (एनआयसी) यांनी तयार केली आहे. तेच वेबसाईटविषयीच्या समस्या सोडवतात. काही समस्या असल्यास ई-मेल करा. तो एनआयसीकडे पाठवला जाईल. तेच ही समस्या सोडवतील, असे माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.