४८३ विधवांना सरकारी मदतीची अजूनही प्रतीक्षाच

२,०८४ पैकी १,६०१ अर्ज मंजूर


23 mins ago
४८३ विधवांना सरकारी मदतीची अजूनही प्रतीक्षाच

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : २१ वर्षांहून कमी वयाची मुले असलेल्या ४८३ विधवा सरकारी मदतीची वाट पहात आहेत. दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेखाली त्यांचे अर्ज मान्यतेसाठी अद्यापही प्रलंबित आहेत, अशी माहिती समाजकल्याण खात्याने दिली आहे.
दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा एक घटक म्हणून ज्या विधवांची मुले २१ वर्षांहून कमी वयाची आहेत, त्यांना महिन्याला ४००० रुपये इतके आर्थिक साहाय्य मिळते. मुलांचे वय २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर विधवांचे हे आर्थिक साहाय्य थांबवले जाते. मुलांचा शैक्षणिक खर्च आणि कुटुंबाच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी राज्य सरकारने ही योजना कार्यान्वित केली आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेखाली अर्ज करावा.
आतापर्यंत २,०८४ विधवांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी १,६०१ अर्ज मंजूर होऊन संबंधितांना लाभ मिळत आहेत. अद्यापही ४८३ अर्ज कागदपत्रांच्या पडताळणीसाठी प्रलंबित आहेत. आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर प्रलंबित अर्जही मंजूर केले जातील, असे खात्याने सांगितले.
लाभार्थी विधवा ‘गृह आधार’साठीही पात्र
लाभार्थी विधवांना ४००० रुपयांच्या साहाय्याबरोबरच गृह आधार योजनेचाही लाभ चालूच राहतो. यासाठी लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न दीड लाखांहून अधिक असू नये. अपत्य एक असो वा दोन याचा लाभ मिळण्यावर परिणाम होत नाही. दोनपैकी एका मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण झाले आणि दुस ऱ्याचे वय २१ वर्षाखाली असल्यास संबंधित विधवेला योजनांचे लाभ सुरूच रहातात.