रशियन सिरियल किलरकडून क्रूरतेचा कळस

महिलांना ठार मारून मृतदेहावर नृत्य : एकीचा मृतदेह जंगलात फेकल्याची कबुली


1 hours ago
रशियन सिरियल किलरकडून क्रूरतेचा कळस

आरोपीला तपासासाठी नेताना पोलीस. (निवृत्ती शिरोडकर)

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पेडणे/पणजी : उत्तर गोव्यातील किनारपट्टी भागात सिरियल किलिंगच्या माध्यमातून महिलांना ‘मोक्ष’ प्राप्त करून दिल्याचा दावा करणाऱ्या आलेक्सी लिओनोव या रशियनाचे आणखी कारनामे समोर आले आहेत. एखाद्या महिलेला ठार मारल्यानंतर तिच्या मृतदेहावर तो उन्मादात नाचायचा, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. हिमाचल प्रदेश आ​णि गोव्यात मिळून सुमारे १५ महिलांना ठार मारल्याची कबुली त्याने यापूर्वीच दिली आहे. याशिवाय आणखी एका युवती​चा खून करून आपण तिला जंगलात फेकून दिल्याचे त्याने सांगितले. मात्र ते ठिकाण आठवत नसल्याचे त्याने सांगितल्याने पोलीसही चक्रावले आहेत.
आलेक्सी लिओनोव हा पोलिसांना नवीनवी धक्कादायक माहिती देत आहे. कोरगाव येथे काही महिन्यांपूर्वी ७३ वर्षीय विदेशी महिलेचा मृत्यू झाला होता. तिलाही आपणच ‘मोक्ष’ दिल्याचा दावा त्याने केला आहे. त्यामुळे अनैसर्गिक मृत्यू म्हणून नाेंद झालेल्या या प्रकरणाचाही पुन्हा तपास होणार आहे. गोव्यात ५ जणींना, तर हिमाचलप्रदेश येथे १० जणींना आपण ‘मोक्ष’ प्राप्त करून दिल्याचा दावा आलेक्सी करतो. गुरुवार, १५ रोजी हरमल येथे एलिना कास्तानोवा (३७) हिचा मृतदेह आढळला होता. तिला आपल्या जाळ्यात ओढून आलेक्सी याने तिचे हात पाठीमागे बांधून तिच्याशी संभोग केला. नंतर अत्यंत निर्घृणपणे तिच्या मानेवर धारदार हत्याराने वार करून खून केला. ‘एलिना हिला आता मोक्ष मिळाला,’ असे म्हणत तो अत्यंत हिडीसपणे तिच्या मृतदेहावर नाचला. हा प्रकार शेजारच्या खोलीत वास्तव्यास असलेल्या एलिनाच्या मैत्रिणीने पाहिला व ती घाबरून पळून गेली होती.
दरम्यान, मोरजी येथे शुक्रवार, १६ रोजी एलिना वानोवा (३७) हिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत बाथरूमजवळ आढळला होता. तिच्याही मानेवर धारदार हत्याराचे वार दिसून आले होते. आलेक्सी याने तिचा खूनही​ याच पद्धतीने करून ‘मोक्ष’ मिळवून दिल्याचे सांगितले होते. त्यापूर्वी बुधवार, १४ रोजी मृतावस्थेत आढळलेल्या मृदुस्मिता सायकिया या ४० वर्षीय आसामी महिलेचाही आपणच खून केल्याची कबुली आलेक्सी याने दिली होती.
डायरी ठरणार महत्त्वाचा दुवा
पोलिसांना आलेक्सी लिओनोव याची डायरी सापडली असून या डायरीत अनेक नोंदी केल्याचे दिसून आले आहे. मात्र हा मजकूर रशियन भाषेत असल्यामुळे त्याचे भाषांतर आणि पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या डायरीतून अनेक खुलासे होणार असून पोलिसांना या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी या नोंदी उपयुक्त ठरणार आहेत.
खुनासाठी वापरलेली हत्यारे जप्त
तपासादरम्यान पोलिसांनी संशयिताने हत्येसाठी वापरलेली दोन्ही धारदार हत्यारे जप्त केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आलेक्सी हा देखणा असल्याने परदेशी युवतींना सहजपणे प्रेमाच्या जाळ्यात ओढत असे. विकृत मनोवृत्तीच्या आरोपीने महिलांचा अनन्वित छळ केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. आरोपी वारंवार जबाब बदलत असल्याने पोलिसांना तपासात अडथळे येत आहेत. त्याने केवळ दोनच नाही तर इतरही काही महिलांचे बळी घेतल्याचा दाट संशय पोलिसांना असून, तज्ज्ञांच्या मदतीने त्याची कसून चौकशी केली जात आहे.