भाजीच्या लागवडीत वाढ; मात्र उत्पन्न घटले

कृषी खात्याच्या दोन वर्षांच्या आकडेवारीतून स्पष्ट


1 hours ago
भाजीच्या लागवडीत वाढ; मात्र उत्पन्न घटले

शेतात केलेली भाजीची लागवड. (संग्रहित)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात भाजी लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली; परंतु उत्पन्नात घट झाली आहे. पावासाळी पीक लागवडीत मोठी वाढ झाली; परंतु वायंगणी हंगामातील पिकांमध्ये घट झाली. दोन वर्षांत लागवड क्षेत्रात १६५ हेक्टरांची वाढ दिसून आली. मात्र भाजीचे उत्पन्न ३,६५५ टनांनी कमी झाले. २०२५ मध्ये पावसाळी हंगामात लागवड आणि उत्पन्न कमी नोंदवले गेले, असे कृषी खात्याच्या आकडेवारीवरून दिसून येते.
२०२३ ते २०२५ पर्यंत कारले, भेंडी, कोकणी दुधी, वांगी, मिरची, चिटकी, कोथिंबीर, दुधी, मुळा, तांबडी भाजी, घोसाळे, मका, वाल, पालक, मेथी, शेपू, पडवळ, चिबूड, वालपापडी आदी भाज्यांचे २.५८ लाख टन इतके उत्पादन स्थानिक शेतकऱ्यांनी मिळवले होते. २०२४ मध्ये लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली; पण उत्पन्न घटले. २०२३ मध्ये ८,६९८ हेक्टर क्षेत्रात, तर २०२४ मध्ये ८,८६३ हेक्टर क्षेत्रात भाजीची लागवड झाली होती. २०२३ मध्ये १.१४ लाख टन, तर २०२४ मध्ये १.१० लाख टनांपर्यंत भाजीचे उत्पादन मिळाले.
सध्या २०२५ मधील पावसाळी हंगाम संपला असून वायंगणी हंगाम सुरू आहे. २०२४ च्या तुलनेत २०२५ मधील पावसाळी हंगामात लागवड क्षेत्रात २२१ हेक्टर कमी नोंद झाली आहे. उत्पादनात ४,०२१ टन इतकी घट दिसून आली. २०२३ आणि २०२४ यांच्या पावसाळी पिकाच्या लागवडीत ६१ हेक्टर आणि उत्पादनात ३,८०७ टन वाढ नोंद झाली आहे. वायंगण पिकाच्या लागवडीत ११३ हेक्टरची वाढ नोंद झाली असून परंतु उत्पादन मात्र ७,४६२ टनांनी कमी नोंदवले गेले आहे.