सर्व सदस्यांची प्रभावी कामगिरी : फलक फडकवून, हौद्यात उतरून नोंदवला निषेध

अधिवेशनात सभापतींसमोरील हौद्यात उतरून निषेध नोंदवताता विरोधी आमदार. (संग्रहित)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : नुकत्याच संपलेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात बर्च क्लब अग्नितांडव, नोकरीसाठी पैसे घेणे, युनिटी मॉल या प्रश्नांवरून विरोधी आमदारांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. बर्च दुर्घटनेवर सभागृहात चर्चा झाली नसली तरी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना विरोधी आमदारांनी हा मुद्दा जोरकसपणे मांडला.
पाच दिवस चाललेल्या हिवाळी अधिवेशनाचा समारोप शुक्रवार, १६ रोजी झाला. पहिल्या दिवशी, सोमवारी फक्त राज्यापालांचे अभिभाषण झाले. त्यामुळे कामकाजासाठी चारच दिवस मिळाले होते. चारही दिवशी सर्व विरोधी आमदारांनी कामकाजात भाग घेऊन सरकारावर निशाणा साधण्याची संधी साधली. बर्च दुर्घटनेबाबत चर्चेची मागणी विरोधकांनी अभिभाषणाच्या चर्चेवेळीच केली होती; मात्र ती नाकारण्यात आली. यावरून विरोधकांनी सभापतींसमोरील हौद्यात धाव घेतली. गोंधळ वाढल्याने सभापतींनी सर्व विरोधी आमदारांना मार्शलांकरवी सभागृहाबाहेर काढले. मायकल लोबो यांनी याविषयी लक्षवेधी सूचना मांडली होती. मात्र तेच गैरहजर असल्यामुळे ती चर्चेला येऊ शकली नाही. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, कार्लुस फेरेरा आणि विजय सरदेसाई यांनी अभिभाषणावरील चर्चेत मत मांडताना बर्चचा मुद्दा मांडला. बर्च दुर्घटनेचा दंडाधिकाऱ्यांमार्फत केलेल्या चौकशीचा अहवाल खुला करण्याची मागणी त्यांनी केली. विषय न्यायप्रविष्ट असल्याने आरोपपत्र दाखल झाल्यानंतर अहवाल सभागृहात ठेवण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. दोषींवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. एकही दोषी सुटणार नाही, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
नोकरीसाठी पैसे घेतल्याच्या प्रकरणातील संशयित पूजा नाईक हिने केलेल्या आरोपांवरून बरीच चर्चा झाली होती. प्रश्नोत्तरे आणि लक्षवेधी सूचनेवेळी विरोधकांनी हा विषय मांडला. युरी आलेमाव आणि अन्य विरोधी आमदारांनी प्रकरणाची पूर्ण चौकशी होऊन तक्रारदारांचे पैसे परत देण्याची मागणी केली. न्यायालयाच्या आदेशानंतर पैसे परत केले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अधिवेशन काळात प्रस्तावित युनिटी मॉलच्या विरोधात चिंबलवासीयांचे आंदोलन सुरू होते. रूडॉल्फ फर्नांडिस यांनी या विषयीची लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर चर्चा सुरू असताना विरोधकांनी सभापतींसमोरील हौद्यात धाव घेऊन घोषणाबाजी करत प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. याशिवाय कोळशाचे प्रदूषण, दाबोळी विमानतळावरील एअर कनेक्टिविटी, पाणी टंचाई आदी मुद्देही विरोधकांनी प्रभावीपणे मांडले.
विजय सरदेसाईंचे ६८, युरींचे ६७ प्रश्न
विजय सरदेसाई यांनी ६८, युरी आलेमाव ६७, क्रूझ सिल्वा ६४, व्हेंझी व्हिएगस यांनी ६१, कार्लुस फेरेरा ५६, वीरेश बोरकर ४३, तर एल्टन डिकॉस्टा यांनी ३२ प्रश्न विचारले.
शून्य प्रहर, लक्षवेधी सूचना मांडण्यातही उत्तम कामगिरी
क्रूझ सिल्वा, विजय सरदेसाई, वीरेश बोरकर, युरी आलेमाव, व्हेंझी व्हिएगस यांनी प्रत्येकी ४ मुद्दे शून्य प्रहरात उपस्थित केले. यानंतर एल्टन डिकॉस्टा यांनी ३, तर कार्लुस फेरेरा यांनी एक मुद्दा उपस्थित केला. विरोधी आमदारांतर्फे सादर झालेल्य ४ लक्षवेधी सूचनांपैकी तीन सूचना सर्वांनी मिळून दाखल केल्या होत्या. यामध्ये बेरोजगारी आणि नोकरीसाठी पैसे देणे या विषयांचा समावेश होता.