महाराष्ट्र : अनैतिक संबंधांसाठी दबाव टाकणाऱ्याचा काढला काटा

जबाबातील तफावतीमुळे माय-लेक अडकले

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
22 mins ago
महाराष्ट्र : अनैतिक संबंधांसाठी दबाव टाकणाऱ्याचा काढला काटा

छत्रपती संभाजीनगर : अनैतिक संबंध ठेवण्यासाठी ​एका व्यक्तीने महिलेवर सातत्याने दबाव टाकला. हे सहन करण्यापलीकडे झाल्याने तिने आपल्या १८ वर्षीय मुलाला ही गोष्ट सांगितली. मग दोघांनी​ मिळून त्या व्यक्तीचा काटा काढला. पण जबाबातील विसंगतीमुळे दोघांचेही​ बिंग फुटले आणि ते पोलिसांच्या तावडीत सापडले.

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ही घटना घडली. कन्नड तालुक्यातील जामडी फॉरेस्ट शिवारात सापडलेल्या अनोळखी मृतदेहाच्या खुनाचा अखेर छडा लावण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणात खून करणारी महिला व तिच्या १८ वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आले. क्राईम पेट्रोल, सीआयडी, दृष्यम या मालिका, चित्रपट पाहून हा कट रचण्यात आला. खून प्रकरणातील पुरावे नष्ट कसे करायचे, कोणताही तांत्रिक पुरवा कसा राहणार नाही, याची खबरदारी घेत हा खून करण्यात आला. या प्रकरणात वंदना राजू पवार (४५) व धीरज राजू पवार (१८, रा. जामडी फॉरेस्ट शिवार, ता. कन्नड) अशी संशयितांची नावे आहेत.

ही खुनाची घटना १३ जानेवारी रोजी उघडकीस आली. पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख राजू रामचंद्र पवार (रा. जामडी, कन्नड) अशी पटविली. त्यानंतर आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केला. घटनास्थळी मृताच्या अंगावरील अंडरवेअर, चप्पल व फुटलेला मोबाईल सापडला होता. जंगलाचा भाग असल्यामुळे तांत्रिक पुराव्यांचा अभाव होता. खुनाचा तपास करण्यासाठी ६० ते ७० संशयितांची पोलिसांनी कसून चौकशी केली. मृतदेह सापडलेल्या ठिकाणालगतचे शेत राजू जोधा पवार यांचे असून त्याची देखभाल पत्नी वंदना व मुलगा धीरज करत असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी या दोघांची चौकशी सुरू केली. या दोघांच्या जबाबात विसंगती आढळली. विसंगती आढळताच वंदना आणि धीरज उर्फ टेमा या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

शरीरसंबंधांसाठी राजूचा दबाव

पोलिसांनी वंदनाचा जबाब घेतला असता, तिने सांगितले की, तिच्यावर राजू पवार अनैतिक संबंधांसाठी दबाव टाकत होता. या त्रासाला ती कंटाळली होती. अखेर कंटाळून राजू आपल्याला त्रास देत आहे, असे तिने मुलाला सांगितले. त्यानंतर दोघांनी राजू याचा खून करण्याचा कट रचला. १३ जानेवारी रोजी वंदनाने राजू याला शेताजवळ बोलावले. तो कपडे काढत असतानाच धीरजने लाकडी ओंडक्याने त्याच्या डोक्यावर व गुप्तांगावर वार केले. यासाठी वंदनानेही मदत केली व राजू याचा जीव घेतला. पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह नाल्यात झाडाच्या मुळाशी पाण्यात अडकवून ठेवण्यात आला.

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

पोलिसांनी धीरजच्या मोबाईलचा डेटा तपासला असता, तो क्राईम पेट्रोल, सीआयडी, दृश्यम तसेच ओटीटीवरील क्राईम सिरीज पाहत असल्याचे दिसून आले. याशिवाय त्याने खून किंवा गुन्ह्यांच्या तपासात कोणत्या गोष्टी पुरावे म्हणून राहतात, त्या राहू नयेत यासाठी काय करायला हवे, याचीही माहिती घेऊन डिजिटल ट्रेल टाळण्यासाठी सीम कार्ड बदलणे, मोबाईल फोडणे अशी कृत्ये केल्याचे समोर आले.

हेही वाचा