कमी उत्पन्न असलेल्यांना मिळणार लाभ

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गरीब तसेच स्वतःचे घर नसलेल्यांना सवलतीच्या दरात घर बांधणे शक्य व्हावे म्हणून लवकरच ‘मुख्यमंत्री गृहनिर्माण योजना’ सुरू होणार आहे. योजनेचे नियम व उत्पन्नाची मर्यादा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गृहनिर्माण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून ही माहिती मिळाली.
राज्यात जमिनीचे दर वाढत आहेत. मोठ्या प्रमाणात बांधकामांचे दर वाढत असल्याने घर बांधणे सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहे. यावर उपाय म्हणून योजना तयार करण्याचे सुतोवाच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. गृहनिर्माण मंडळाचे प्लॉट विविध प्रकारच्या लोकांसाठी उपलब्ध आहेत. कमी उत्पन्न (एलआयजी), मध्यम उत्पन्न (एमआयजी) आणि अधिक उत्पन्न (एचआयजी) असलेल्यांसाठी प्लॉटची योजना आहे. तरीही त्या प्लॉटचा दर हा सर्वसामान्यांना परवडणारा नाही. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री गृहनिर्माण योजना सुरू होणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष आमदार जीत आरोलकर यांनी दिली.
वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्नाची मर्यादा असलेल्यांनाही या योजनेचा लाभ मिळेल. तसेच ज्यांना घर नाही, त्यांना अधिक सवलती मिळतील. योजनेतील सवलती, नियम तयार करणे, या विषयीची प्रक्रिया सुरू आहे, असेही आमदार आरोलकर यांनी सांगितले.