मडगाव पोलिसांकडून टेलिकॉम कंपन्यांवर गुन्हे दाखल

बेकायदा केबल कारवाई प्रकरण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21 mins ago
मडगाव पोलिसांकडून टेलिकॉम कंपन्यांवर गुन्हे दाखल

मडगाव : वीज खात्याचे कार्यकारी अभियंता आणि नोडल अधिकारी काशिनाथ शेट्ये यांनी दिलेल्या तक्रारीवरून मडगाव पोलिसांनी कारवाई केली आहे. सरकारी कामात अडथळा आणणे आणि आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी एजकॉम टेलीकम्युनिकेशन, एथरनेट टेलिकॉम आणि संबंधित संशयितांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

वीज खात्याच्या खांबांचा वापर करून शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा फायबर केबल्स टाकण्यात आल्या होत्या. यामुळे सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. या बेकायदा व्यवहारामुळे सरकारला सुमारे ११० कोटी रुपयांचा फटका बसल्याचा दावा अभियंता शेट्ये यांनी केला आहे. वीज विभागाने ३ फेब्रुवारी रोजी नोटीस जारी करून १० दिवसांच्या आत बेकायदा केबल्स काढून घेण्याचे आदेश दिले होते. संबंधित कंपन्यांनी या नोटीसकडे दुर्लक्ष केले. अखेर अभियंता शेट्ये यांनी पुढाकार घेऊन या बेकायदा केबल्स कापण्याची कारवाई केली. ही कायदेशीर प्रक्रिया रोखण्यासाठी काही राजकीय व्यक्तींच्या माध्यमातून आपल्यावर दबाव आणला गेला आणि धमकावण्यात आले, असा गंभीर आरोप शेट्ये यांनी तक्रारीत केला आहे.

मडगाव पोलिसांनी या प्रकरणी महादेव गावकर (एजकॉम टेलिकॉम) आणि इतरांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस निरीक्षक सूरज सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शुभम गावकर या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. 

हेही वाचा