संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे मुख्यमंत्र्यांना आश्वासन

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार सदानंद शेट तानावडे, मंत्री मॉविन गुदिन्हो आणि आमदार नीलेश काब्राल.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : दाबोळी विमानतळ नागरी विमान वाहतुकीसाठी आधीप्रमाणे सुरूच राहील, असे आश्वासन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले. दिल्लीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत दाबोळी विमानतळावरील नागरी विमान वाहतुकीवर चर्चा झाली, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. यावेळी वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो, राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार नीलेश काब्राल उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, तसेच पक्षाचे अन्य पदाधिकारी सोमवारी दिल्लीला गेले होते. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड मंगळवारी होणार आहे. नामांकन तसेच निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी गोव्याचे मंत्री, तसेच पक्षाचे पदाधिकारी दिल्लीला गेले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांची निवड निश्चित मानली जात आहे. या दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी इतरांसोबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेतली.