समुद्रकिनाऱ्यांवर गेल्या पाच वर्षांत ९६ जणांचा बुडून मृत्यू

२६४५ जणांचे प्राण वाचवण्यात यश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21st January, 11:43 pm
समुद्रकिनाऱ्यांवर गेल्या पाच वर्षांत ९६ जणांचा बुडून मृत्यू

पणजी : गेल्या पाच वर्षांत गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर बुडून मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाल्याचे समोर आले आहे. पर्यटन खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सन २०२१ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत एकूण ९६ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये समुद्रकिनाऱ्यांवर अनोळखी मृतदेह सापडलेल्या घटनांचाही समावेश आहे.

विशेष म्हणजे, सन २०२३ नंतर बुडून मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते. मात्र, गेल्या एका वर्षातच १७ जणांचा बुडून मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या काळात दृष्टी लाइफगार्ड्सने तब्बल २,६४५ जणांचे प्राण वाचवले आहेत. दरवर्षी सरासरी ४०० ते ६०० जणांना बुडण्यापासून वाचवण्यात येत असल्याची माहिती पर्यटन खात्याने दिली आहे.

मागील वर्षी ४६२ जणांना बुडताना बाहेर काढले. २०२१ मध्ये ६२५, २०२२ मध्ये ४६१, २०२३ मध्ये ४६७ आणि २०२४ मध्ये ६३९ जणांना बुडताना बाहेर काढण्यात आले.

पर्यटन खात्याने गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर ११६ अधिकृत स्विमिंग झोन निश्चित केले असून, या स्विमिंग झोनमध्ये एकाही बुडण्याच्या घटनेची नोंद झालेली नाही, ही दिलासादायक बाब आहे. भविष्यात गरज आणि परिस्थिती पाहून आणखी स्विमिंग झोन घोषित केले जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.


हेही वाचा