वाऱ्याची गती वाढल्याने राज्यात हुडहुडी वाढली

आंबा, काजूचे उत्पादन वाढण्याची शक्यता


19th January, 11:53 pm
वाऱ्याची गती वाढल्याने राज्यात हुडहुडी वाढली

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मकर संक्रातीनंतर थंडीचे प्रमाण कमी होऊन हळूहळू उकाडा सुरू होतो. मकर संक्रांतीच्या वेळी खरेदर थंडी कमी होत असते; मात्र सोमवारी तापमानात घट झाल्याची नोंद झाली. त्यामुळे थंडीचा जोर पुन्हा वाढल्याचे अनुभवास येत आहे. दिवसभर गार वारे वहात असते. या वाऱ्यामुळेच पुन्हा थंडीतही वाढ होऊ लागली आहे, अशी माहिती पणजीच्या वेधशाळेने दिली आहे.
सोमवारी पणजीतील कमाल तापमान ३१.२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १९ अंश सेल्सिअस होते. मुरगावचे कमाल तापमान ३१ अंश, तर किमान तापमान १९.४ नोंदवले गेले. आगामी तीन दिवस कमाल तापमान ३२ ते ३३ अंश, तर किमान तापमान २१ ते २२ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने रात्री पुन्हा दव पडायला सुरुवात झाली आहे. यंदा थंडी उशिरा सुरू झाली. पाऊस लांबल्याने थंडीचेही उशिरा आगमन झाले. यंदा दिवाळीत थंडी नव्हती. पूर्ण डिसेंबरमध्ये मात्र थंडी होती. ग्रामीण भागात तापमान १६ अंशांपर्यंत उतरले होते. आता पुन्हा थंडी पडू लागली आहे. रात्री तसेच सकाळच्या वेळी स्वेटर वा मफलर न घालता दुचाकी चालवणे अशक्य होत आहे.
बळीराजा सुखावला
आता पडत असलेली थंडी आंबा आणि काजू पिकांना फायदेशीर ठरत आहे. आंबा आणि काजूच्या झाडांना चांगला मोहर बहरला आहे. पाऊस वा दव न पडल्यास दोन्हीचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बागायतदार आणि शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.