बागकरची​ पोलीस, तर बिजय कुमारची न्यायालयीन कोठडीत रवानगी

बर्च दुर्घटना प्रकरण : बिजय कुमारचा जामीन अर्ज सादर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
6 hours ago
बागकरची​ पोलीस, तर बिजय कुमारची न्यायालयीन कोठडीत रवानगी

म्हापसा : साकवाडी हडफडे येथील बर्च क्लब आग दुर्घटना प्रकरणातील संशयित बडतर्फ पंचायत सचिव रघुवीर बागकर याला म्हापसा न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तर, क्लबचा ऑपरेशनल मॅनेजर संशयित बिजय कुमार सिंग याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. तसेच क्लबचा सहमालक अजय गुप्ता याच्या न्यायालयीन कोठडीमध्ये अजून १४ दिवसांची वाढ करण्यात आली.

हणजूण पोलिसांनी १६ जानेवारी रोजी बडतर्फ पंचायत सचिव संशयित रघुवीर बागकर याला चिखली-कोलवाळमध्ये पकडून अटक केली होती. शनिवार, १७ रोजी संशयिताला म्हापसा येथील प्रथमश्रेणी न्यायालयात हजर करण्यात आले असता ५ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

तर, संशयित बिजय कुमार सिंग याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यालाही पोलिसांनी न्यायालयात हजर केले. तेव्हा संशयिताच्या वकिलाने अतिरीक्त पोलीस कोठडीला हरकत घेतली व न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याची विनंती केली. दुर्घटनेवेळी आपल्या अशीलानेच स्वतःहून अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली होती. आईचे मुंबईमध्ये आजारपणामुळे निधन झाल्याने आपला अशील गोव्यातून गेला होता. त्यामुळे तो पळून गेला या पोलिसांच्या दाव्यामध्ये तथ्य नसल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

दरम्यान, बिजय कुमार सिंग याने म्हापसा जिल्हा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयासमोर जामीन अर्ज सादर केला असून त्यावर गुरुवार, २२ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.

अजय गुप्ता याच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

बर्च क्लबसाठी अबकारी खात्याचा (उत्पादन शुल्क) परवाना मिळवण्यासाठी कांदोळी आरोग्य केंद्राचा बनावट ना-हरकत दाखला वापरल्या प्रकरणातील संशयित आरोपी क्लबचा सहमालक अजय गुप्ता याच्या न्यायालयीन कोठडीत आणखीन १४ दिवसांची वाढ करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. 

हेही वाचा