रघुवीर बागकरचा अटकपूर्व जामीन अर्ज मागे

पणजी : हडफडे नागवाचा अपात्र सरपंच रोशन रेडकर याला अंतरिम दिलासा देण्यास गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने शनिवार, १७ रोजी नकार दिला आहे. दरम्यान, तत्कालीन सचिव रघुवीर बागकर याला हणजूण पोलिसांनी शुक्रवार, १६ रोजी अटक केली. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला. या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवार, १९ रोजी होणार आहे. सत्र न्यायालयाने अटकपूर्व अर्ज फेटाळल्यापासून हणजूण पोलीस रेडकर याचा शोध घेत आहेत.
हडफडे येथील बर्च क्लबमधील अग्नितांडवात २५ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी रोशन रेडकर आणि रघुवीर बागकर यांनी उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने दोघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. या आदेशाला दोघांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. दरम्यान, उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना हणजूण पोलिसांनी शुक्रवार, १६ रोजी सायंकाळी तत्कालीन सचिव रघुवीर बागकर याला कार्मुली येथून अटक केली. त्यामुळे उच्च न्यायालयात दाखल केलेले अटकपूर्व जामीन अर्जावरची आव्हान याचिका मागे घेतली.
शनिवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सरकारी अभियोक्ता सोमनाथ कर्पे यांनी आपला युक्तिवाद पुढे सुरू ठेवला. त्यांनी ४ जानेवारी २०१४ रोजी काणकोण येथील रुबी रेसिडेन्सी दुर्घटनेचा संदर्भ दिला, ज्यात ३१ कामगारांचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात नगरपालिका अभियंता अजय देसाई याच्या अटकपूर्व जामिनासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा दाखला त्यांनी सादर केला.
सत्तेचा जाणीवपूर्वक गैरवापर
बेकायदेशीर व्यवसाय परवाना जारी केल्यामुळे ‘बर्च बाय रोमिओ लेन’ ला व्यवसाय करण्यास मोकळीक दिली आहे. ही एक अनियमितता नसून, सरपंच आणि सचिवाने सत्तेचा जाणीवपूर्वक केलेला गैरवापर आहे. त्यामुळे क्लबच्या मालकांना गैरवाजवी फायदा करून देण्यात आला. त्यामुळे षड्यंत्र उघडकीस आणण्यासाठी पोलीस कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचा युक्तिवाद सोमनाथ कर्पे यांनी करून तत्कालीन सरपंच रोशन रेडकर याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावण्याची मागणी केली.