पानांचे ताट

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
17th January, 10:52 pm
पानांचे ताट

​निसर्गातील वेगवेगळ्या पानांवर तुम्ही कधी जेवण जेवला आहात का?

पूर्वी लोक वेगवेगळ्या झाडांच्या पानांना विशिष्ट पद्धतीने जोडून गोलाकार ताटं बनवत असत. या ताटांना पत्रावळी असे म्हणत. आपल्या गोव्यात खास करून फणसाच्या पानांच्या पत्रावळी केल्या जात आणि सण-उत्सवांमध्ये त्यावर जेवण वाढले जात असे. आजही बाजारात कागदाच्या किंवा पोफळीच्या पत्रावळी पाहायला मिळतात.

दक्षिण भारतात कधी फिरायला गेला असाल, तर तिथल्या हॉटेलमध्ये इडली–वडा किंवा भात–सांबार प्लेटवर नाही, तर केळीच्या पानावर वाढलेलं तुम्ही नक्की पाहिलं असेल. हिरव्या पानावर वाढलेली गरमागरम इडली, वडा आणि चटणी पाहिली की आपोआपच भूक लागते, नाही का?

आपल्याकडेही देवाला नैवेद्य अर्पण करताना किंवा सणासुदीच्या दिवशी पंगत वाढताना केळीच्या पानाचा वापर केला जातो. कारण केळीच्या पानावर जेवण्याचे अनेक फायदे आहेत.

केळीच्या पानावर जेवण्याचे फायदे

 जेवण जास्त चविष्ट लागते

केळीचे पान अन्नाची चव वाढवते, त्यामुळे जेवण अधिक रुचकर लागतं.

 भूक वाढते आणि पचन सुधारते

केळीच्या पानावर जेवल्याने भूक चांगली लागते आणि अन्न नीट पचते.

 गरम जेवण अधिक पौष्टिक होतं

गरम जेवण केळीच्या पानावर वाढल्यावर पानातील नैसर्गिक गुण अन्नात उतरतात, त्यामुळे अन्न अधिक पोषणमूल्य असलेलं होतं.


 हृदयासाठी हितकर

केळीच्या पानावर जेवण करणे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते.

  निसर्गासाठी चांगले


केळीचं पान स्वच्छ, नैसर्गिक आणि पर्यावरणाला हितकारक असतं. जेवण झाल्यावर पान धुवायची गरज नसते आणि ते निसर्गात परत गेल्यावर सहज कुजतं. त्यामुळे कचरा होत नाही.

म्हणजेच केळीच्या पानावर जेवण म्हणजे निसर्गाची काळजी घेणं!

कधीतरी सुट्टीच्या दिवशी घरच्यांसोबत केळीच्या पानावर जेवण्याचा अनुभव घ्या.

जेवणाची मजा तर येईलच, शिवाय तुम्ही निरोगी आणि आनंदीही राहाल!


- वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य