
तुम्हाला असं कधी झालं आहे का, की अचानक तोंडात वेदना सुरू झाल्या? जेवताना, पाणी पिताना किंवा बोलताना सुद्धा त्रास होऊ लागला. गालाच्या आतल्या बाजूने, जिभेवर किंवा ओठांच्या आतल्या बाजूने नीट बघितलं तर छोटीशी मूगा एवढी जखम दिसली? यालाच आपण तोंड येणे किंवा इंग्रजीत माउथ अल्सर असे म्हणतो. हा त्रास का होतो हे जाणून घेतल्यास तुम्ही यापासून स्वतःला वाचवू शकता.
तोंड का येते?
आयुर्वेदानुसार आपल्या शरीरात तीन दोष असतात – वात, पित्त आणि कफ यामध्ये पित्त दोष वाढला की तोंडात जळजळ, फोड, वेदना होऊ शकतात. पित्त म्हणजे काय? तर सोप्प्या भाषेत उष्णता. शरीरातील उष्णता म्हणजेच गरमी वाढली तर हा त्रास होऊ शकतो.
खालील कारणांमुळे तोंड येऊ शकते –
१. खूप तिखट, आंबट किंवा गरम पदार्थ रोज, जास्त प्रमाणात किंवा उन्हाळ्यात खाणे - उदा. अति तिखट चटणी किंवा ठेचा, शेवपुरी, पाणीपुरी , लोणचे इ.
२. जंक फूड जास्त खाणे.
३. पोट साफ न होणे - म्हणजे रोज शी न होणे.
४. खूप उशिरापर्यंत रात्री जागे राहणे.
५. कमी पाणी पिणे.
६. उष्ण पदार्थ खाणे उदा. चॉकलेट, दही.
७. दातांना ब्रेसेस घातल्यानंतर काही दिवसांनी ब्रेसेस तोंडातील मऊ त्वचेला घासून अल्सर येतात.
८. दाढ किडून पोखरून टोकदार झाली असेल तर ते टोक तोंडाला आतून घासले असता सुद्धा तोंड येते.
तोंड आल्यावर त्या ठिकाणच्या वेदना, जळजळ कमी करण्यासाठी काय करावे?
१.जिथे वेदना आहेत तिथे साजूक तूप लावावे.
२. धण्याचे पाणी प्यावे.
३. दुर्वांचा रस किंवा साधे पाणी तोंडात थोडा वेळ धरून ठेवणे. लाळ येऊन तोंड भरले की साध्या पाण्याने गुळण्या कराव्या.
४. जंक फूड, तिखट - आंबट पदार्थ, अति चॉकलेट, तेलकट पदार्थ पूर्णपणे टाळावे.
५. जखम भरून येईपर्यंत पातळ पदार्थ जसे की पेज, नाचणी सत्व, पातळ रवा, फळांचा रस, नारळाचे पाणी, मूग डाळ तांदळाची साधी खिचडी व साजूक तूप असे पदार्थ सेवन करावे.
असे सोपे उपाय केल्यास माऊथ अल्सर पासून आराम मिळेल.

- वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य