व्हायरसची गोष्ट आणि सुपरहिरो मास्क!

Story: गोष्टी गोजिरवाण्या |
31st January, 10:31 pm
व्हायरसची गोष्ट आणि सुपरहिरो मास्क!

एके दिवशी चिंटू शाळेतून घरी आला आणि म्हणाला, “आई, आता सगळं नॉर्मल झालंय ना? मग हात का धुवायचे, मास्क का घालायचा?”

आई हसली आणि म्हणाली, “चिंटू, तुला सुपरहिरो आवडतात ना?”

“हो!” चिंटू लगेच ओरडला.

“मग ऐक. आपल्या आजूबाजूला काही असे अदृश्य व्हायरस राक्षस असतात, जे डोळ्यांना दिसत नाहीत. ते नाक, तोंड, डोळे यांतून आपल्या शरीरात शिरायचा प्रयत्न करतात.”

हे ऐकून चिंटू थोडा घाबरला.

आई पुढे म्हणाली, “पण काळजी करू नकोस. आपल्याकडे तीन सुपरहिरो आहेत!”

पहिला सुपरहिरो : साबण आणि पाणी

हातांवर खेळताना, शिंकताना, खोकताना खूप जंतू चिकटतात. साबणाने २० सेकंद नीट हात धुतले की हे जंतू ‘फुस्स’ होतात! म्हणून जेवणाआधी, बाहेरून आल्यावर आणि शौचानंतर हात धुणं खूप महत्त्वाचं आहे.

दुसरा सुपरहिरो : रुमाल आणि शिंकण्याची शिस्त

शिंक किंवा खोकताना तोंडासमोर हात नको, रुमाल किंवा कोपर वापरायचा. नाहीतर जंतू हवेत उडून दुसऱ्यांवर बसतात. म्हणजे एक जण आजारी, मग सगळेच!

तिसरा सुपरहिरो : मास्क 

मास्क म्हणजे फक्त आजारातच वापरायचा असं नाही. सर्दी-खोकला, ताप, गर्दीची जागा, रुग्णालय – अशा ठिकाणी मास्क आपलं आणि समोरच्याचं दोघांचंही संरक्षण करतो. तो आपल्या नाक-तोंडावरचा ढाल आहे.

आई शेवटी म्हणाली, “चिंटू, मास्क आणि स्वच्छता म्हणजे भीती नाही, ती शहाणपणाची सवय आहे.”

चिंटू हसला आणि म्हणाला, “मग मी रोज सुपरहिरोच आहे! हात धुणार, शिस्त पाळणार आणि गरज असेल तेव्हा मास्क घालणार!”

लक्षात ठेवा मुलांनो:

स्वच्छ हात, स्वच्छ सवयी आणि योग्य वेळी मास्क –

हेच आपले खरे सुपरपॉवर्स आहेत! 


- डॉ. पूनम संभाजी, बालरोगतज्ज्ञ