होळी होळी पुरणाची पोळी

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
28th February, 11:12 pm
होळी होळी पुरणाची पोळी

ऋ​​तूंचा राजा म्हटला जाणारा वसंत ऋतू सध्या सुरू आहे. ज्याला इंग्रजी भाषेत 'स्प्रिंग सिझन' म्हणतात. या ऋतूला ऋतूंचा राजा का म्हटलं जातं तुम्हाला माहित आहे का? कारण या ऋतूत निसर्ग अतिशय सुंदर दिसतो. आंब्याच्या झाडाला मोहोर येतो, पळस, पारिभद्र, शाल्मली या सारखी सुंदर फुले फुलतात त्यामुळे आजूबाजूला निसर्ग छान छान रंगांनी सजलेला दिसतो. एखाद्या राजाकडे कशा भरपूर सुंदर सुंदर गोष्टी असतात की नाही??? आणि राजा त्यातल्या छान छान गोष्टी आपल्या प्रजेला सुद्धा देतो. तसंच खूप सुंदर सुंदर, रंगबिरंगी फुलं, विविध रसदार फळं वसंत ऋतू आपल्याला देतो, आपले मन आनंदीत करतो म्हणून वसंत ऋतू हा ऋतूंचा राजा. फक्त वेगवेगळ्या गोष्टीच नाही तर आपल्याला आनंदी व निरोगी ठेवण्यासाठी वेगवेगळे सण सुद्धा या ऋतूत येतात. 

त्यातलाच एक आपल्या आवडीचा होळीचा सण. होळीतली मला आवडणारी सगळ्यात आवडती गोष्ट आहे पुरण पोळी. प्रत्येक सणाला देवाचा नैवेद्य हा खास असतो नाही?? आणि चविष्ट सुद्धा असतो. पुरणाची पोळी चविष्ट तर आहेच त्याचबरोबर हेल्दी आहे. गरमा गरम पुरण पोळी त्यावर साजूक तुपाची धार आणि वेलचीचा सुगंध असलेलं नारळाचं दूध एका वाटीत... आहाहा. काहींना पूरण पोळी बरोबर कटाची तिखट आमटी आवडते. 

पुरण पोळीत काय काय असतं माहित आहे? गव्हाचं पीठ तसेच चणाडाळ, गूळ, जायफळ आणि वेलची पूड घालून केलेलं पुरण व साजूक तूप. 

पुरण पोळी पौष्टिक आहे. 


 ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर. ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांनी होळीच्या दिवशी इतर काहीही न खाता पुरण पोळीवर ताव मारावा. 

 ज्यांना वजन वाढवायचं नाही त्यांनी सुद्धा पुरण पोळी खावी पण होळीचा प्रसाद म्हणून एकंच खावी. 

 हरभऱ्याची डाळ, गूळ, गहू हे पदार्थ शरीराला ताकद देतात. 

 खूप शारीरिक काम करणाऱ्यांनी पुरण पोळी खाल्ली असता थकवा कमी होतो. आणि शरीराची होणारी झीज भरून यायला मदत होते.

पुरण पोळी गोड, चविष्ट, पौष्टिक असली तरी पचायला मात्र कठीण आहे म्हणून ती साजूक तूप घालून खावी आणि गोड बाधू नये म्हणून त्यासोबत तिखट अशी कटाची आमटी घ्यावी. अतिप्रमाणात पुरण पोळ्या खाल्ल्या तर पोटात दुखू शकते त्यामुळे जास्त खाणे टाळा.

आपल्या सण उत्सवांमध्ये केले जाणारे गोड धोड पदार्थ हे किती हेल्दी आहेत बघा. त्यामुळे चॉकलेट, केक, बाजारातील मिठाया, क्रीम बिस्कीटं यासारखे पोषणमूल्य कमी असलेले , प्रिझर्वेटिव्ह असलेले आणि आरोग्याला त्रासदायक असे पदार्थ खाण्यापेक्षा आपले पारंपारिक गोड पदार्थ खा आणि मजा करा.


- वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य