
गोट्या भारी खट्याळ मुलगा! तो नेहमीच काही ना काही दंगा-मस्ती करत असायचा. ‘साईवैभव’ कॉलनीतील लोक तर गोट्या येतोय असं बघूनच घाबरून जायचे. आठ वर्षांच्या गोट्याच्या दंगेखोर आणि मस्तीखोर स्वभावाचा धसका सगळ्यांनीच घेतला होता.
साईवैभव कॉलनी तशी टापटीप आणि शिस्तप्रिय लोकांची वस्ती म्हणून ओळखली जायची. भलं मोठं गेट, तिथे चोवीस तास तैनात असलेला सिक्युरिटी गार्ड, स्विमिंग पूल, लहान मुलांना खेळायला छोटं मैदान, आजी-आजोबांसारख्या वयस्कर व्यक्तींना चालण्यासाठी एका बाजूला वॉकिंग ट्रॅक आणि भोवती चार मजली इमारती, अशी ही कॉलनी होती. गोट्या फारच दंगेखोर असल्याने सर्वजण त्याच्यापासून चार हात लांबच राहत. गोबरे गाल आणि गोरापान गोट्याला बघून त्याचे लाड करावेसे वाटायचे; पण काय करणार? त्याची खोडच तशी आड यायची. मस्ती आणि दंगा करण्याबरोबरच गोट्याला अजून एक वाईट सवय होती. ती म्हणजे कचरा कुठेही फेकण्याची. काहीही खाल्लं की त्याचा कागद किंवा साल तो तिथेच टाकून द्यायचा.
त्याची आई त्याला कितीतरी वेळा सांगायची, “गोट्या, चॉकलेटचा कागद कचरापेटीत टाक रे.” तो लगेच म्हणायचा, “अगं आई, एवढ्याशा गोष्टीकडे कोण लक्ष देतंय?” आई त्याला समजावून सांगायची, “हे चूक आहे रे. छोट्या छोट्या गोष्टींमुळेच पुढे मोठे नुकसान होते.” पण गोट्या काही ऐकत नसे.
अशा मस्तीखोर गोट्याला दिनू, चिंटू, रोशनी, पार्थ आणि महेश असे मित्र-मैत्रिणी होते. हे सर्वजण मिळून दिवसभर गोट्याच्या खोड्या सहन करायचे. एकदा क्रिकेट खेळताना गोट्याने केळं खाल्लं आणि साल थेट मैदानातच टाकली. थोड्याच वेळात रोशनी तिथे धावत आली आणि त्या केळ्याच्या सालीवरून घसरून पडली. रोशनीने उठून रागाने विचारले, “गोट्या! तू असं का करतोस रे?” गोट्या खिदळत म्हणाला, “अरे, मजा आली की नाही तुला?”
पण बाकीचे मित्र मात्र गंभीर झाले. चिंटू म्हणाला, “मजेच्या गोष्टी वेगळ्या; पण असं काही पायाखाली आल्यामुळे रोशनी पडली, तिला खरचटलं, हे बरोबर नाही. परत असं करू नकोस.” गोट्या थोडा नरमला; पण त्याला अजूनही या गोष्टीचे गांभीर्य पटले नव्हते.
एकदा शाळेत सामंत टीचर स्वच्छता आणि तिचे महत्त्व यावर धडा शिकवत होत्या. “बरं का मुलांनो, स्वच्छता राखली नाही तर आजार पसरतात. म्हणून आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे की, कचरा नेहमी कचरापेटीतच टाकायचा.” गोट्याने ते ऐकले, पण मनातल्या मनात म्हणाला, “मी एकट्याने काही केले तरी काय फरक पडणार? बाकी सगळे तर ठेवतात ना स्वच्छता!”
उन्हाळ्याची सुट्टी होती. दुपारी जेवल्यानंतर गोट्या आंबा खात खिडकीत बसला होता. सवयीनुसार त्याने साली अंगणातच फेकल्या. काही वेळाने परब काका तिथून जात असताना त्यांचा पाय एका सालीवर पडला आणि ते घसरून खाली पडले. सगळे धावत आले. काकांना बरंच खरचटलं होतं. ते रागाने ओरडले, “ही साल कुणी टाकली? आम्ही काय लोकांनी टाकलेला कचराच गोळा करत राहायचा का?”
गोट्या खूप घाबरला. आईने त्याचा कान धरून विचारले, “साल तूच टाकली होतीस का?” गोट्याने मान खाली घातली. त्याला स्वतःची खूप लाज वाटली. तेवढ्यात आजी तिथे आली. तिने गोट्याला प्रेमाने जवळ बोलावले आणि म्हणाली, “बाळा, चूक झाली तर ती मान्य करायला हवी. स्वच्छता ही फक्त आई-बाबांची जबाबदारी नाही, ती आपलीही आहे. आपल्यामुळे कुणाला त्रास होऊ नये याची काळजी घ्यायला हवी. तू तर माझा शहाणा बाळ आहेस ना? आज बघ, तुझ्यामुळे काकांना खरचटलं, त्या दिवशी रोशनीलाही लागलं होतं. रोज तुझ्या अशा काही ना काही उचापती सुरूच असतात. मला त्याचं वाईट वाटतं. मला माझ्या गोट्याचा अभिमान वाटावा असं तू वागशील का?”
गोट्या थोडा वेळ गप्प राहिला आणि म्हणाला, “आजी, मी चुकलो. आता मला सुधारायचं आहे. पण मी काय करू?” आजी हसून म्हणाली, “अरे, फार काही करायची गरज नाही. तू खूप चांगला मुलगा आहेस. फक्त काही खाल्ल्यानंतर जो कचरा होईल, तो इकडे-तिकडे न फेकता कचरापेटीत टाकायचा. ही सवय स्वतःला लावून घे. बाकी थोडीफार मस्ती तर लहान मुलांनी करायलाच हवी.”
गोट्याने स्वतःमध्ये बदल करायला सुरुवात केली. त्याने आई-बाबा आणि मित्र-मैत्रिणींना सांगितले की, “मी कचरा इकडे-तिकडे टाकताना दिसलो, तर मला ओरडा. मला ही वाईट सवय बदलायची आहे आणि त्यासाठी तुम्ही मला मदत करा.” सगळ्यांना हे ऐकून खूप बरं वाटलं. सुरुवातीला थोडी चिडचिड झाली, पण सर्वांनी त्याला साथ दिली. हळूहळू गोट्याची सवय बदलली आणि आता तो सर्वांचा आवडता झाला.
गोट्या आता हसून सर्वांना सांगतो, “आतापासून मी कचरा कुठेही टाकणार नाही आणि कुणाला त्रास होईल अशी मस्तीही करणार नाही.” सर्वांचा लाडका गोट्या आता स्वच्छतेचे महत्त्व पटवून देतो:
कचरा नेहमी कचरापेटीतच टाका.
प्लास्टिकचा वापर कमी करा.

- सौ. मंजिरी वाटवे