
एका सुंदर उपनगरात चिंटू नावाचा एक अतिशय उत्साही आणि खेळकर मुलगा राहायचा. चिंटूला निसर्गात फिरायला, पक्षी बघायला आणि त्याहूनही जास्त म्हणजे ऋतूंनुसार मिळणारी फळे खायला खूप आवडायचे. नुकताच हिवाळा संपला होता आणि निसर्गाचे रूप पालटू लागले होते. झाडांना नवी पालवी फुटली होती, आमराईत कोकिळेचे कुहू-कुहू गाणे ऐकू येत होते आणि हवेत एक वेगळाच दरवळ होता. हो, वसंत ऋतूचे आगमन झाले होते!
वसंत ऋतू आला की चिंटूला खूप आनंद व्हायचा, कारण याच दिवसांत हळूहळू उन्हाचा चटका जाणवू लागायचा. चिंटूच्या मते, उन्हाळा जवळ येणे म्हणजेच आईस्क्रीम, थंडगार ज्युस आणि मनसोक्त पोहण्याचे दिवस येणे! दुपारी शाळा सुटली की चिंटू आपल्या मित्रांसोबत मैदानात खूप खेळायचा. त्या दिवशी तर सूर्याने चांगलेच दर्शन दिले होते. खेळून खेळून चिंटू पूर्णपणे घामाघूम झाला होता. त्याचे कपाळ घामाने डबडबले होते आणि तहान लागून त्याचा गळा पार सुकला होता.
धापा टाकत चिंटू घरात शिरला. आई स्वयंपाकघरात काहीतरी कामात होती. चिंटूने सरळ फ्रिज गाठला. फ्रिज उघडताच त्यातून येणाऱ्या गारव्याने त्याला खूप छान वाटले. त्याने आत पाहिले, तर तिथे लालचुटूक कलिंगडाच्या फोडी, थंडगार लिंबू सरबत आणि आईस्क्रीमचा मोठा डबा ठेवलेला होता. चिंटूचे डोळे चमकले! तो स्वतःशीच पुटपुटला, 'बापरे! किती गरम होतंय आज, आता तर काहीतरी एकदम गारेगार हवंच!'
आईने लांबूनच ओरडून सांगितले, "चिंटू, बाळ, आताच फ्रिजमधले काही खाऊ नकोस. आधी थोडा वेळ पंख्याखाली बस, घाम सुकू दे आणि मग साधे पाणी पी." पण चिंटूचे लक्ष कशातच नव्हते. त्याला फक्त ते थंडगार पदार्थ दिसत होते. आई दुसऱ्या खोलीत जाताच चिंटूने घटाघटा दोन ग्लास थंड सरबत प्यायले आणि त्यावर कलिंगडाच्या चार-पाच मोठ्या फोडी खाल्ल्या. एवढ्यावर त्याचे मन भरले नाही, म्हणून त्याने एसीचा रिमोट घेतला, तापमान एकदम १६ अंशांवर सेट केले आणि चक्क एसीच्या समोरच ठाण मांडले!
"आह! काय मज्जा येतेय," असे म्हणत चिंटू तिथेच सोफ्यावर पडून राहून गोष्टींचे पुस्तक वाचू लागला. पण अर्ध्या-पाऊण तासातच त्याला काहीतरी विचित्र वाटू लागले. त्याच्या नाकातून पाणी येऊ लागले आणि घसा थोडा खवखवू लागला. थोड्या वेळाने तर त्याला जोरात खोकला येऊ लागला. चिंटूला कळेना की हे काय होतेय? त्याने विचार केला, 'बाहेर तर एवढा उकाडा आहे, मग मला अचानक थंडी वाजून सर्दी कशी काय झाली?'
चिंटू रडत रडत आईकडे गेला. आईने त्याच्या कपाळाला हात लावला तर काय, चिंटूला थोडी कणकणही जाणवत होती. आई म्हणाली, "बघ चिंटू, मी तुला आधीच सांगितले होते ना! आता वसंत ऋतू सुरू झाला आहे."
चिंटूने आश्चर्याने विचारले, "आई, पण वसंत ऋतूत तर उष्णता असते ना? मग सर्दी कशी काय होते?"
तेव्हा आईने त्याला जवळ घेतले आणि समजावून सांगू लागली, "बघ बाळा, आयुर्वेदात याला खूप महत्त्व आहे. आपण जेव्हा हिवाळ्यात असतो, तेव्हा हवेत खूप थंडी असते. त्यामुळे आपल्या शरीरात 'कफ' साठून राहतो. आता वसंत ऋतू आला की वातावरणात सूर्याची उष्णता वाढू लागते. जसा उन्हाने बर्फ वितळतो, तसाच शरीरात साठलेला तो कफ या उष्णतेमुळे वितळायला लागतो. त्यामुळेच नाक वाहणे, खोकला येणे आणि घसा दुखणे असे त्रास होतात. त्यात तू तर आज फ्रिजमधले पदार्थ खाऊन आणि एसी लावून त्या कफला अजूनच वाढवले आहेस!"
चिंटूला आपली चूक उमजली होती. त्याने आईला विचारले, "आई, मग आता मी काय करू? मला लवकर बरे व्हायचे आहे." आईने त्याला कोमट पाणी प्यायला दिले आणि वाफ घ्यायला सांगितली. चिंटूने कान पकडले आणि मनाशी ठरवले की आता तो ऋतूच्या नियमांनुसारच आपला आहार घेईल. त्याला समजले की निसर्गाचे आपले एक वेळापत्रक असते आणि आपण ते पाळले तरच आपण निरोगी राहू शकतो.
मित्रांनो, चिंटूसारखी तुमची फजिती होऊ नये आणि तुम्ही या वसंतात आनंदाने डुलत राहावे असे वाटत असेल, तर या ऋतूत नेमकी काय काळजी घ्यावी? आपल्या शरीरातला हा कफ कसा नियंत्रणात ठेवावा? यासाठी तुमच्या याच 'हुप्पा हुय्या' पानावर खाली 'स्वस्थ रहा मस्त रहा' मध्ये कृपाताईने खूप छान आणि सोपी माहिती दिली आहे. ती नक्की वाचा आणि तसेच वागा!

स्नेहा सुतार