दुहेरी खुनाने पेडणे तालुका हादरला : पाच हत्या केल्याची संशयिताची कबुली

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पेडणे/हरमल : हरमल व मोरजी येथे दोन ३७ वर्षीय रशियन पर्यटक महिलांचा निर्घृण खून केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी मांद्रे पोलिसांनी आलेक्सेई लिओनोव (३७) या रशियन नागरिकाला अटक केली आहे. चौकशीवेळी संशयिताने एकूण पाच विदेशी महिलांचा खून केल्याचे सांगितल्याने बेपत्ता विदेशी महिलांची माहिती पोलीस मिळवत आहेत. पोलीस महानिरीक्षकांनी रात्री उशिरापर्यंत पोलीस स्थानकात तळ ठोकला होता.
बामणभाटी, हरमल येथे खुनाची पहिली घटना गुरुवार, १५ रोजी रात्री ९.३० च्या सुमारास उघडकीस आली. या ठिकाणी भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या एलिना कास्तानोव्हा (३७) हिचा संशयिताने गळा चिरून खून केला होता. पीडितेची मैत्रिण असलेली रशियन महिला तिच्या शेजारच्या खोलीत वास्तव्यास होती. हा खुनाचा प्रकार तिच्या निदर्शनास येताच तिने घटनास्थळावरून धाव घेतली. संशयितही तिथून उडी टाकून पसार झाला. नंतर घटनेची माहिती मांद्रे पोलिसांना देण्यात आली.
मैत्रिणीकडून माहिती घेत पोलिसांनी संशयित रशियन नागरिकाचा शोध सुरू केला. घटनास्थळाचा पंचनामा पोलीस करत होते. सुमारे दोन-अडीच तासाने संशयित घटनास्थळी आला. तिथे खाकी गणवेषातील पोलिसांना पाहताच त्याने पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून संशयितास पकडले. ताब्यात घेऊन नंतर खुनाच्या आरोपाखाली त्याला अटक केली. संशयित मादक पदार्थाच्या नशेत होता.
दुसरी घटना शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास उघडकीस आली. एलिना वानिवा (३७) या महिलेचा मृतदेह तिच्या भाड्याच्या खोलीत अंशतः कुजलेल्या स्थितीत आढळून आला. एलिना हिचा खून १४ जानेवारी रोजी मध्यरात्री केल्याची माहिती संशयित आरोपीने पोलिसांना दिली. एलिना वानिवाचा बुधवार, १४ रोजी रात्रीपासून संपर्क होत नव्हता. एलिनाची लहान मुलगी तिला वारंवार फोन करत होती; पण मोबाईल बंद होता. त्यामुळे एलिनाच्या कुटुंबियांनी गोव्यात तिच्यासोबत पर्यटनासाठी आलेल्या एका ओळखीच्या व्यक्तीला माहिती दिली. सदर व्यक्ती शोध घेत एलिनाच्या खोलीवर आली. तेव्हा खोलीचा दरवाजा उघडा होता. आत बाथरूमच्या दरवाजानजीक एलिना निपचित पडली होती. खोलीमध्ये दुर्गंधी पसरली होती. लगेच घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. मांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
दुहेरी खून प्रकरणातील दोन्ही खुनांसाठी वापरलेली शक्कल समान होती. दोन्ही महिलांचा खून धारदार हत्याराने गळा चिरूनच केला होता. त्यामुळे पोलिसांनी संशयित आलेक्सेई लिओनोव याची कसून चौकशी केली. तेव्हा त्याने एलिना वानिवा हिचा खूनदेखील आपणच केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या दोन्ही खून प्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक नितीन हळर्णकर, निनाद देऊलकर यांच्या साहाय्याने निरीक्षक गीतेंद्र नाईक पुढील तपास करत आहेत.
संशयिताचे दोघांशीही मैत्रीचे संबंध
संशयित आरोपी आलेक्सेई लिओनोव याचे मृत पावलेल्या दोन्ही महिलांशी मैत्रीचे संबंध होते. त्यामुळे दोन्ही महिलांच्या खोलीवर त्याचे ये-जा होते. एलिना वानिवा दि. १० डिसेंबर रोजी, तर एलिना कास्तानोव्हा २४ डिसेंबर रोजी गोव्यात पर्यटनासाठी आली होती. गोव्यात आल्यावर संशयिताशी त्यांची ओळख झाली होती.
संशयित सिरियल किलर असल्याचा संशय
पोलीस चौकशीत संशयिताने पाच विदेशी महिलांचा खून केल्याचे उघड केले आहे. त्यामुळे पोलीस खाते खडबडून जागे झाले आहे. संशयिताच्या जबाबानंतर पोलीस महासंचालक आलोक कुमार यांच्यासमवेत सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मांद्रे पोलीस स्थानकात धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत पोलीस महासंचालकांसह अधिकारी संशयिताची चौकशी करत होते. कोणत्या भागात संशयिताने महिलांचा खून केला, याची पडताळणी पोलीस करत आहेत.