राजकारणात नैतिकतेवर मोठा सवाल

सोलापूर/जालना : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी घटना समोर आली असून गंभीर गुन्ह्यांचे आरोप असलेले उमेदवार थेट जनतेच्या कौलावर विजयी झाले आहेत. सोलापूरमध्ये मनसे नेते बाळासाहेब सरवदे यांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी भाजपच्या उमेदवार शालन शिंदे या तुरुंगात असतानाही निवडून आल्या आहेत. तर जालन्यात पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर अपक्ष म्हणून विजयी झाले आहेत. या दोन्ही निकालांनी राज्यात नैतिकता, राजकीय पक्षांची जबाबदारी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. ऐरवी भाजपमध्ये नेत्यांच्या प्रवेशामुळे राजकारण ढवळून निघते. मात्र आता एका गुन्हेगार व्यक्तीलाच निवडून आणल्याने विरोधक भाजपवर टीका करत आहेत.
सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये मनसे नेते बाळासाहेब सरवदे यांच्या खून प्रकरणामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले गेले होते. या प्रकरणात भाजपच्या उमेदवार शालन शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय न्यायालयीन कोठडीत आहेत. असे असतानाही, सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत कोणताही प्रचार न करता शालन शिंदे विजयी झाल्या. त्यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) उमेदवार आफ्रिन पठाण यांचा तब्बल १०,७६७ मतांनी पराभव केला. या विजयामुळे उलटसुटल चर्चा सुरू झाल्या आहेत.
२ जानेवारी २०२६ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती. प्रभाग २ मध्ये भाजपने शालन शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली होती, तर रेखा सरवदे यांना माघार घेण्यावर राजकीय दबाव टाकण्यात आला. याच दबावातून वाद आणि हाणामारी झाली. हा वाद सोडवण्यासाठी मनसे नेते बाळासाहेब सरवदे मध्यस्थी करत असताना, शालन शिंदेंच्या कुटुंबातील सदस्यांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा खून केला. या घटनेनंतर सोलापूरचे राजकारण चांगलेच तापले. मनसे नेते अमित ठाकरे यांनीही सोलापुरात येऊन सरवदे कुटुंबाची भेट घेत तीव्र संताप व्यक्त केला होता. मात्र तरीही भाजपने शालन शिंदे यांनाच आपला अधिकृत उमेदवार ठरवत निवडणूक लढविली आणि शिंदे या तुरुंगातूनच विजयी झाल्यामुळे विरोधक भाजपवर टीका करीत आहेत.
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीही विजयी
जालन्यात पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर यांनी महापालिका निवडणुकीत विजय मिळवला आहे. निवडणुकीपूर्वी त्यांची शिवसेना (एकनाथ शिंदे गट) कडून जालना विधानसभा मतदारसंघ प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, तीव्र टीकेनंतर ही नियुक्ती रद्द करून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. तरीही त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत विजय मिळवला.