शाळेने परीक्षेला बसू न दिल्याने बारावीच्या विद्यार्थिनीची​ आत्महत्या

सासमोळे-बायणा येथील घटना


10 mins ago
शाळेने परीक्षेला बसू न दिल्याने बारावीच्या विद्यार्थिनीची​ आत्महत्या

आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीच्या घराबाहेर जमलेले लोक.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
वास्को : बारावीच्या परीक्षांमध्ये प्रगती चांगली नसल्याने एका उच्च माध्यमिक विद्यालयाने फेब्रुवारीला होणाऱ्या बारावीच्या परीक्षेस बसू दिले जाणार नाही, असे सांगितल्याने सासमोळे-बायणा येथील एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली. वास्को पोलिसांनी पंचनामा केला.
सदर विद्यार्थिनी एका उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या वर्गात शिकत होती. तिची आतापर्यंतच्या परीक्षेत प्रगती अपेक्षित अशी नसल्याने विद्यालयाने तिच्या पालकांना बुधवारी बोलावले होते. शिक्षकांनी आई-वडिलांना तीच्या प्रगतीविषयी सांगितले. बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकणार नसल्यामुळे तिला परीक्षेला बसू दिले जाणार नसल्याचे सांगण्यात आले. पालकांकडून काहीतरी लिहून घेण्यात आले. परीक्षेला बसता येणार नसल्याचा विद्यार्थिनीच्या मनावर मोठा परिणाम झाला. विद्यालयाबाहेर आल्यावर तिला चक्कर आली. तिची आई बायणामध्ये भाजी विकते. तिची समजूत काढून आईवडील घराबाहेर पडले. सायंकाळी घरी आल्यावर त्यांना मुलगी घरात दिसली नाही. मुलाकडे विचारणा केली असता त्याने, ती शौचालयास गेली असून बराच वेळ परतलेली नाही, असे सांगितले. त्यांनी शौचालयाकडे धाव घेतली. तेव्हा तिने आत्महत्या केल्याचे दिसून आले.