पालकांच्या खात्यात थेट जमा होणार रक्कम : मुख्यमंत्री शिक्षण सुविधा योजना जाहीर

पणजी : राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता गणवेश आणि रेनकोट देण्याऐवजी त्यासाठीची रक्कम थेट त्यांच्या पालकांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. यासाठी शिक्षण खात्याने गोवा मुख्यमंत्री शिक्षण सुविधा योजना जाहीर केली असून, त्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सरकारी शाळांमधील इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांना गणवेश खरेदीसाठी ६०० रुपये दिले जाणार आहेत. ही रक्कम आधार कार्डशी लिंक असलेल्या पालकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तसेच, इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांना रेनकोट खरेदीसाठी ५०० रुपये दिले जाणार आहेत. ही रक्कमही थेट पालकांच्या खात्यात जमा केली जाईल.
याशिवाय, सरकारी शाळांमधील इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांना २०० पानांच्या २ वही आणि १०० पानांच्या २ वह्या दिल्या जाणार आहेत. तसेच, सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना २०० पानांच्या ६ वह्या दिल्या जाणार आहेत.
यापूर्वी रेनकोट आणि गणवेशासाठी निविदा काढून ते विद्यार्थ्यांना वितरित केले जात होते. मात्र, त्या प्रक्रियेमुळे अनेकदा उशीर होत असल्याने विद्यार्थ्यांना वेळेत साहित्य मिळत नव्हते. ही अडचण दूर करण्यासाठी आता योजनेत बदल करून थेट रोख रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.