उत्तर गोवा जिल्हा पंचायत बैठक : अधिकार वाढवण्याचीही मागणी

रेश्मा बांदोडकर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : जिल्हा पंचायतीच्या सदस्यांना वार्षिक कामासाठी खर्चाची मर्यादा असते. या मर्यादेत मतदारसंघातील कामे होत नाहीत. त्यामुळे जिल्हा पंचायत सदस्यांना वार्षिक किमान १ कोटी रुपयांपर्यंत निधी देण्यात यावा, जेणेकरून अधिक कामे करता येतील. जिल्हा पंचायत सदस्यांचे मानधन वाढवून देण्याचीही मागणी करण्यात आली. पगारासंबंधीचा विषय पुढील बैठकीत घेण्यात येणार आहे, असे उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष रेश्मा बांदोडकर यांनी सांगितले. सदस्यांना अधिक अधिकार द्यावेत, अशी मागणी जिल्हा पंचायतीच्या पहिल्याच बैठकीत करण्यात आली.
उत्तर गोवा जिल्हा पंचायतीची पहिली सर्वसाधारण सभा मंगळवारी पणजीत जिल्हा पंचायत कार्यालयात अध्यक्ष रेश्मा बांदोडकर यांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीत स्थायी समिती, सामाजिक कार्य समिती, आरोग्य समिती व इतर समित्यांची स्थापना करण्यात आली. या बैठकीला उत्तर गोव्यातील सर्व २५ जिल्हा पंचायत सदस्य उपस्थित हाेते.
उत्तर गोवा जिल्हा पंचायतीने मागील पाच वर्षांत चांगल्या पद्धतीने कामे हाती घेतली होती. मुख्यमंत्र्यांकडून वेळोवेळी सहकार्य लाभले. प्रत्येक सदस्याला दरवर्षी ४० ते ५० लाखांचा निधी मिळतो. त्यामध्ये वाढ करून तो १ कोटींपर्यंत मिळावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. जिल्हा पंचायतीला जादा अधिकार मिळावेत, असेही अध्यक्ष रेश्मा बांदोडकर यांनी सांगितले. ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत येणारा निधी वापरण्याचे अधिकार जिल्हा पंचायत सदस्यांना मिळावेत, असा ठराव सदस्यांनी मांडला.