सुरक्षितपणे पोहचविले हॉटेलपर्यंत : घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मडगाव : दक्षिण गोव्यात (South Goa) रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या एका विदेशी महिला पर्यटकाला (Foreign lady tourist) बिकट स्थितीत एका महिलेने मदतीचा हात दिला. मोबाईल ऍपमधील नेव्हिगेशनमध्ये बिघाड झाल्यामुळे ती परतीचा रस्ता चुकली. रात्रीची वेळ, अपरिचित माणसे आणि अनोळखी भाग यामुळे तिची घाबरगुंडी उडाली. मात्र एका स्थानिक महिलेने तिची मनस्थिती ओळखून मदत केली आणि सुरक्षितपणे तिच्या हॉटेलपर्यंत नेऊन पोहचवले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटीझन्सच्या पसंतीस उतरला आहे.
X वरील एका पोस्टद्वारे ही घटना समोर आली. दक्षिण गोव्यातील बेताळभाटी ते कोलवा या दरम्यानच्या भागात रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पायी चालत आपल्या हॉटेलकडे परत जाण्याचा प्रयत्न करत असलेल्या विदेशी पर्यटक महिलेला तिच्या मोबाईलमधील नकाशाचे ॲप्लिकेशन योग्य मार्ग दाखवत नसल्यामुळे ती घाबरली. परतीसाठी कोणताही ठोस मार्ग दिसत नसल्यामुळे आणि आजूबाजूला फारसे शिक्षित लोक नसल्यामुळे ती अस्वस्थ झाली.
त्याच दरम्यान तिथून जाणाऱ्या सिंधू कुमारी (Sindhu Kumari) नावाच्या एका स्थानिक महिलेने त्या महिलेला रडताना पाहिले आणि थांबण्याचा निर्णय घेतला. काही तरी गडबड आहे हे लक्षात घेऊन सिंधू तिच्याजवळ गेली आणि तिला धीर दिला. तिला मदतीची गरज आहे का, असे विचारले. परिस्थिती समजल्यानंतर तिने तिला धीर देऊन तिच्या हॉटेलकडे सोडण्याची ग्वाही दिली.
त्यानंतर सिंधूने त्या पर्यटकाला बेताळभाटी (Betalbatim) येथील हॉटेल कोकोनट ग्रोव्ह बीच रिसॉर्टमध्ये (Coconut Grove Beach Resort) नेले. या मदतीबद्दल त्या पर्यटकाने तिला पैसे देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सिंधूने नम्रपणे नकार दिला. त्याऐवजी तिने आपला इंस्टाग्राम हँडल शेअर केला आणि त्या महिलेला सांगितले की, तिच्या मुक्कामादरम्यान पुन्हा कधी मदतीची गरज लागल्यास तिने संपर्क साधावा.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
हा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंडिंग होत असून अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी सिंधूच्या दयाळूपणाबद्दल आणि प्रसंगावधानाबद्दल तिची प्रशंसा केली आहे. पर्यटक अडचणीत असताना मदत केल्याबद्दल अनेकांनी तिचे आभार मानले, तर काहींनी तिच्या कृतीला गोव्यातील आपुलकी आणि आदरातिथ्याचे प्रतिबिंब असल्याचे म्हटले आहे.