शिष्टमंडळाकडे चर्चेस तयार : मुख्यमंत्री

पणजी : युनिटी मॉल प्रकल्पाला (Unity Mall Project) विरोध करताना विरोधी आमदारांनी हौदात धाव घेत प्रकल्पाच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यामुळे सभागृहाचे कामकाज प्रथम १० मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. तोयार तळ्याकडून युनिटी मॉल प्रकल्प हा ४०० मीटर दूर आहे. तळ्याजवळ आलेल्या खासगी इमारतींना (Buildings) विरोध न करता युनिटी मॉलला विरोध कशासाठी? मॉलला विरोध करीत असलेल्या आंदोलकांकडे चर्चा करण्याची सरकारची (Government) तयारी आहे. युनिटी मॉलचा जास्तीतजास्त फायदा चिंबलच्या लोकांना होणार; असे सांगत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी युनिटी मॉलचे समर्थन केले.
आमदार रूडॉल्फ फर्नांडिस यांच्या लक्ष वेधी सूचनचेवर सभागृहात युनिटी मॉल प्रकल्पावर चर्चा केली. कॉंग्रेस, आपसहीत सर्व विरोधी आमदारांनी प्रकल्पाला विरोध केला. युनिटी मॉलच्या विरोधात चिंबलचे ग्रामस्थ गेले १७ दिवस आंदोलन करीत आहेत. या पार्श्वभूमीवर लक्षवेधी सूचनेच्या अनुषंगाने युनिटी मॉल प्रकल्पावर सभागृहात चर्चा झाली.
आमच्याच सरकारच्या काळात ३ सप्टेंबर २०२३ दिवशी तोयार तळे जैवविविधता स्थळ म्हणून अधिसूचीत झाले. या तळयाच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी होत नाही. गोवा राज्य जैवविविधता मंडळाच्या सूचनेनंतर एनआयओने या तळ्याविषयी अहवाल तयार केला. हा प्रकल्प तोयार तळ्याच्या प्रभाव परिसरात येत नाही. पर्यावरणासहीत सर्व परवाने घेतल्यानंतर मॉलचे काम सुरू झाले. प्रकल्पाचा कसलाच परिणाम तोयार तळ्यावर होणार नाही; असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
युनिटी मॉलमधून १ हजार नोकर्या तयार होणार : रोहन खंवटे
युनिटी मॉलमुळे १ हजार नोकर्या तयार होणार. या नोकर्या चिंबलसहीत सांताक्रुझच्या लोकांना मिळणार. युनिटी मॉलमध्ये ५२ दुकाने असणार. शेतीचा माल, खाद्यपदार्थ, हस्तकारागिरी वस्तूंना बाजारपेट मिळणार. याचा स्वयंसहाय्य गटांना लाभ होणार. प्रकल्पाला १०० लोकांचा विरोध असला म्हणून सर्व गावाचा वा मतदारसंघाचा विरोध आहे, असे होत नाही; असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.
देशाच्या विविध भागात एकता मॉल स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. २७ राज्यांनी ३८ एकता मॉल तयार झाली आहेत. केंद्राकडून गोव्याला युनिटी मॉलसहीत ‘टावन स्क्वॅर’, छत्रपती शिवाजी महाराज म्युझीयम आणि कोस्टल सर्किट हे प्रकल्प मंजूर झाले आहेत. तोयार तळ्याजवळ खासगी इमारती आल्या. या इमारतींना लोकांनी विरोध केला नाही. सरकारच्या प्रकल्पांना मात्र विरोध होतो, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.
युनिटी मॉल प्रकल्प हा तोयार तळ्याच्या प्रभावीत परिसरात आहे. युनिटी मॉलमुळे तोयार तळ्याला धोका निर्माण होण्याची भीती आहे. या प्रकल्पाच्या विरोधात ठराव संमत झाला, असे विरेश बोरकर यांनी सांगितले. तोयार तळे हे जैवविविधतेचे स्थळ म्हणून सूचीत झाले आहे. त्यामुळे या तळ्याजवळ युनियी मॉल होणे योग्य नाही. सरकारने आंदोलकांजवळ चर्चा करून युनिटी मॉल प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी आमदार विरेश बोरकर यांनी केली. सांताक्रुझचे आमदार रूडॉल्फ फर्नांडिस यांच्या लक्षवेधी सूचनेवर सभागृहात बराच वेळ चर्चा झाली. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, आपचे आमदार वेंझी व्हिएगस, क्रुझ सिल्वा, कॉंग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्ता, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची भाषणे झाली. या सर्वांनी युनिटी मॉलला विरोध केला.