चिंबलमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! संतप्त जमावाकडून पंच शंकर नाईकला चोप देण्याचा प्रयत्न

पोलीसांनी 'सुरक्षा कडे' करून पंचाला सोडवले.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
चिंबलमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! संतप्त जमावाकडून पंच शंकर नाईकला चोप देण्याचा प्रयत्न

पणजी: चिंबल येथील प्रस्तावित 'युनिटी मॉल' प्रकल्पावरून सुरू असलेल्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले. प्रकल्पाचे समर्थन करणारे चिंबलचे पंच शंकर नाईक आणि आंदोलक यांच्यात झालेल्या तीव्र संघर्षामुळे पंचायत परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. संतप्त आंदोलकांनी पंच शंकर नाईक यांना घेराव घालून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली होती. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत नाईक यांची पोलीस संरक्षणात सुरक्षित सुटका केली.

युनिटी मॉल प्रकल्पाबाबत सरपंचांना जाब विचारण्यासाठी आज आंदोलकांनी चिंबल पंचायतीवर धडक दिली. यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सरपंचानी स्थानिक ग्रामस्थांसोबत राहण्याचे आश्वासन दिल्यानंतर, आंदोलकांनी पंचायत कार्यालयात बसलेले पंच शंकर नाईक यांना बाहेर काढण्याची मागणी लावून धरली.

शंकर नाईक यांनी युनिटी मॉलला पाठिंबा देत ग्रामस्थांच्या भावना दुखावणारा एक व्हिडिओ प्रसारित केला होता. यामध्ये त्यांनी 'स्थानिक विरुद्ध परप्रांतीय' असा वाद उकरून काढल्याचा आरोप करत, ग्रामस्थांनी त्यांना समोर येऊन उत्तर देण्याचे आव्हान दिले.

तणाव वाढल्याने पोलिसांनी नाईक यांना बाहेर काढण्यासाठी मानवी साखळी तयार केली. नाईक बाहेर येताच संतप्त ग्रामस्थांनी त्यांना घेराव घालून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी ढाल बनवून त्यांना जमावातून सुरक्षितपणे बाहेर काढले. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट झाली. विशेष म्हणजे, घटनास्थळी महिला पोलीस कर्मचारी उपलब्ध नसल्याने पुरुष पोलिसांनीच महिला आंदोलकांना बाजूला सारण्याचा प्रयत्न केला, ज्यावरून आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

सभागृहात युनिटी मॉलवर चर्चा 

चिंबल येथील तोयार तलावाजवळ प्रस्तावित 'युनिटी मॉल' आणि 'प्रशासन स्तंभ' प्रकल्पावरून सुरू असलेल्या वादावर पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी विधानसभेत स्पष्टीकरण देताना हा प्रकल्प सर्व पर्यावरणीय नियम पाळूनच पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही दिली. हा 'युनिटी मॉल' (PM-Ekta Mall) केवळ एक व्यावसायिक वास्तू नसून गोव्यातील पारंपारिक कारागीर आणि लघू उद्योजकांना (MSMEs) जागतिक बाजारपेठ मिळवून देणारी सुवर्णसंधी असल्याचे सांगत त्यांनी प्रकल्पाचे राष्ट्रीय महत्त्व अधोरेखित केले.

दरम्यान, स्थानिकांचा वाढता विरोध लक्षात घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी समन्वयाची भूमिका घेतली असून, हा वाद सामोपचाराने सोडवण्यासाठी आंदोलक ग्रामस्थांना चर्चेचे जाहीर निमंत्रण दिले आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना चर्चेचे निमंत्रण दिलेले असतानाच, स्थानिक पातळीवर झालेल्या या हिंसाचारामुळे 'युनिटी मॉल'चा प्रश्न आता अधिकच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



हेही वाचा