पावसाळ्यातही आता खेळाडूंचा सराव थांबणार नाही; क्रीडा प्रशिक्षकांसाठी तवडकरांचा 'मास्टर प्लॅन'

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
1 hours ago
पावसाळ्यातही आता खेळाडूंचा सराव थांबणार नाही; क्रीडा प्रशिक्षकांसाठी तवडकरांचा 'मास्टर प्लॅन'

 पणजी: गोव्यातील क्रीडा प्रशिक्षकांच्या कौशल्याचा आणि वेळेचा वर्षभर प्रभावी वापर करण्यासाठी सरकार आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यात 'स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर्स' आणि 'स्पोर्ट्स स्कूल्स' सुरू करणार असल्याची महत्त्वाची घोषणा क्रीडा मंत्री रमेश तवडकर यांनी विधानसभा अधिवेशनादरम्यान केली. राज्यातील ११० हून अधिक क्रीडा प्रशिक्षकांचा वापर पावसाळ्याच्या काळातही योग्य पद्धतीने व्हावा, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे.

सध्या राज्यात कार्यरत असलेल्या क्रीडा प्रशिक्षकांना दरमहा १.५ लाख रुपयांपर्यंत भरघोस पगार दिला जातो. मात्र, मान्सूनच्या काळात मैदानी खेळांवर मर्यादा येत असल्याने या प्रशिक्षकांच्या सेवांचा अपेक्षित लाभ घेता येत नाही. पावसाळ्यात बाह्य उपक्रम बंद असल्याने प्रशिक्षक रिकामे बसणे योग्य नाही. त्यांचा उपयोग वर्षाचे ३६५ दिवस व्हायला हवा,असे रोखठोक मत व्यक्त करत मंत्र्यांनी या नवीन नियोजनाची माहिती दिली.

या योजनेअंतर्गत मडगाव, बांबोळी आणि पेडणे येथील इनडोअर स्टेडियमसह खासगी संस्थांमधील इनडोअर पायाभूत सुविधांचा वापर केला जाईल. यामुळे खेळाडूंना पावसाळ्यातही सातत्यपूर्ण सराव मिळेल आणि प्रशिक्षकांनाही आपली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडता येईल. या संदर्भात लवकरच एक सविस्तर प्रस्ताव आणि विशेष योजना सादर केली जाणार असून, यामुळे गोव्यातील क्रीडा क्षेत्राचा चेहरामोहरा बदलेल, असा विश्वास मंत्री तवडकर यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा