९ वर्षे उलटली तरी पेडणेकर आणि तुये इस्पितळाच्या पदरी उपेक्षाच!

उपोषणाचा दुसरा दिवस

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
९ वर्षे उलटली तरी पेडणेकर आणि तुये इस्पितळाच्या पदरी उपेक्षाच!

पेडणे: तुये येथे इस्पितळाची भव्य इमारत उभी राहून नऊ वर्षे उलटली, तरीही तिथे आरोग्य सेवा सुरू न झाल्याने पेडणेवासीयांचा संताप अनावर झाला आहे. तुये इस्पितळ कृती समितीतर्फे सुरू करण्यात आलेले सामूहिक साखळी उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले. सरकारने तातडीने मागण्या मान्य न केल्यास येत्या १५ जानेवारी रोजी भव्य मशाल मिरवणूक काढण्याचा इशारा आंदोलकांनी दिला असून, यामुळे पेडणे तालुक्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या संकल्पनेतून गोवा वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या या इस्पितळाचे स्वप्न पाहण्यात आले होते. मात्र, इमारत पूर्ण होऊन नऊ वर्षे झाली तरीही ती धूळ खात पडून असे येथील आंदोलनकर्ते म्हणाले. आगरवाडा-चोपडे नागरिक समितीचे अध्यक्ष विवेक गावकर यांनी संताप व्यक्त केला की, "स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलाला आज मुक्त गोव्यात मूलभूत आरोग्य सुविधांसाठी सरकारविरुद्ध आंदोलन करावे लागते, ही लोकशाहीची शोकांतिका आहे. राज्यात अनेक प्रकल्पांना लोकांचा विरोध असतोमात्र येथे इस्पितळ सुरू व्हावे म्हणून लोक स्वतःहून मागणी करत असूनही सरकार दुर्लक्ष करत असल्याबद्दल कृती समितीच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

या आंदोलनाला आता राजकीय आणि सामाजिक स्तरावरूनही मोठा पाठिंबा मिळत आहे. मांद्रे काँग्रेस गट समितीचे अध्यक्ष नारायण रेडकर आणि गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कळंगुटकर यांनी या परिस्थितीला पूर्णपणे सरकारचे अपयश जबाबदार असल्याची टीका केली आहे. केवळ इमारती उभ्या करून प्रश्न सुटत नाहीत, तर तिथे तज्ज्ञ डॉक्टर्स आणि वैद्यकीय सेवा उपलब्ध होणे गरजेचे आहे. या इस्पितळामुळे केवळ पेडणेच नव्हे तर शेजारील तालुके आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांनाही मोठा आधार मिळणार आहे. त्यामुळे सरकारने आता केवळ पोकळ आश्वासने न देता प्रत्यक्ष सेवा सुरू करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा पवित्रा जनतेने घेतला आहे.

हेही वाचा