३ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी

पणजी : २५ जणांचा बळी घेतलेल्या हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन (Birch by Romeo Lane) आग दुर्घटनेची गोवा (Goa) स्थित मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी आता न्यायालयाने ५२ जणांना प्रतिवादी केले आहे. त्यात किनारी भागातील पंचायती, नगरपालिका, सरपंच, पंचायत संचालनालय, नगरपालिका प्रशासन, झीआरझेड, अग्निशामक दल, लुथरा बंधू इत्यादींचा समावेश आहे. या सर्वांना नोटीस पाठवण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी आता ३ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
ॲडव्होकेट जनरल (AG) देविदास पांगम यांनी सांगितले की, रोमियो लेन आग दुर्घटनेची न्यायालयाने ‘स्वेच्छा दखल’ घेत आणखी ५२ जणांना प्रतिवादी केले आहे. त्यात किनारपट्टीवरील पंचायती, नगरनियोजन विभाग, अग्निशमन दल, नियोजन आणि विकास प्राधिकरण (PDAs) आणि सीआरझेड (CRZ) क्षेत्रातील नगरपालिकांचा समावेश आहे. हडफडेचे माजी सरपंच रोशन रेडकर आणि क्लब मालकांना त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यासाठी वैयक्तिक प्रतिवादी बनवण्यात आले आहे, अशी माहिती ॲडव्होकेट जनरल (AG) देविदास पांगम यांनी दिली. न्यायालय प्रभावी आदेश जारी करण्याबाबत आणि त्यांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्याबाबत गंभीर आहे. राज्य सरकार न्यायालयाला जबाबदारी निश्चित करण्याची आणि या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्यांकडून पीडितांना नुकसान भरपाई मिळावी; याची खात्री करण्याची विनंती करणार असल्याचे एजी देविदास पांगम यांनी सांगितले. कायदे आणि आदेश आधीच अस्तित्वात असले तरी, एजी म्हणाले की, स्वतःहून दाखल केलेल्या या कार्यवाहीमध्ये त्यांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची तपासणी केली जाईल आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी न्यायालय वैयक्तिक स्तरावर प्रकरणांवर लक्ष ठेवण्यास सुरूवात करण्याची शक्यता असल्याचे पांगम यांनी सांगितले.