मुरगावच्या पाण्याचा तिढा एप्रिलपर्यंत सुटणार!

४४३ कोटींचा भव्य जलप्रकल्प अंतिम टप्प्यात : पाणीपुरवठा मंत्री फळदेसाई

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
17 mins ago
मुरगावच्या पाण्याचा तिढा एप्रिलपर्यंत सुटणार!

पणजी: मुरगाव मतदारसंघातील दीर्घकालीन पाणीटंचाईची समस्या येत्या एप्रिल महिन्यापर्यंत पूर्णपणे सुटेल, अशी ग्वाही पाणीपुरवठा मंत्री सुभाष फळदेसाई यांनी विधानसभेत दिली. ४४३ कोटी रुपये खर्चून उभारला जाणारा हा महत्त्वाकांक्षी जलप्रकल्प आता अंतिम टप्प्यात असून, यामुळे मुरगाववासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी उपस्थित केलेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री फळदेसाई यांनी तालुक्याच्या पाणी पुरवठ्याची सविस्तर आकडेवारी मांडली. मुरगाव तालुक्याची एकूण गरज ८१ एमएलडी असून, सध्या ७७ ते ७८ एमएलडी पाणी पुरवले जाते. मुरगावचा काही भाग भौगोलिकदृष्ट्या उंचावर असल्याने पाणी पोहोचवताना तांत्रिक अडचणी येतात. केवळ तांत्रिक बिघाडामुळेच काहीवेळा पाणीपुरवठा खंडित होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सरकारने ४४३ कोटींचा प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम प्रगतीपथावर असून, मुरगावसाठी एक स्वतंत्र जलकुंभ (रिझर्व्होअर) बांधण्यात येत आहे. एप्रिल २०२६ पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर उंचावर असलेल्या भागांनाही पुरेसे पाणी मिळेल आणि वारंवार होणारी पाणीटंचाई दूर होईल, असा विश्वास मंत्र्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा