वागातोर येथील जमिनीसंदर्भातील आव्हान याचिका फेटाळली

पणजी : आमदार मायकल लोबो यांच्या वागातोर येथील सर्व्हे क्र. ३५४/१ मधील जमिनीसंदर्भात दाखल केलेली आव्हान याचिका राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) फेटाळून लावली. संबंधित याचिका कालबाह्य असल्याचे निरीक्षण नोंदवून लवादाने फेटाळून ती फेटाळली. याबाबतचा आदेश न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंह व तज्ज्ञ सदस्य सुजित कुमार वाजपेयी यांनी दिला.
या प्रकरणी जाॅन्सन डिसिल्वा यांनी लवादाकडे आव्हान याचिका दाखल केली होती. त्यानुसार, आमदार मायकल लोबो यांच्या वागातोर येथील सर्व्हे क्रमांक ३५४/१ मधील जमिनीत वाळूच्या थरावर पेव्हर ब्लॉकसह प्रस्तावित प्रवेशमार्गासाठी परवानगी मागितली होती. तसेच लाकडी/स्टील प्लेटचा छोटा पूल, १५ तात्पुरती लाकडी कोटीजीस, १ लाकडी स्वागत कक्ष, १ लाकडी उपाहारगृह आणि संरक्षक भिंत उभारण्यासाठी गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (जीसीझेडएमए) कडे अर्ज केला होत. त्यानुसार, जीसीझेडएमएने ८ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहणी केली होती. त्यानंतर १२ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या जीसीझेडएमएच्या बैठकीत वरील अर्जावर चर्चा करण्यात आली. त्यानुसार, १० जानेवारी २०२५ रोजी जीसीझेडएमएने परवानगी दिली. या परवानगीला एनजीटीकडे आव्हान देण्यात आले होते. तसेच आव्हान अर्ज दाखल करण्यास उशीर झाल्यासंदर्भात अर्ज सादर केला. यावर एनजीटीने सुनावणी घेऊन वरील आव्हान याचिका मर्यादा कालावधीच्या पलीकडे असल्यामुळे फेटाळून लावली आहे.