पेडणे पोलिसांची कारवाई : धारगळ, विर्नोडा, तुये परिसरात चोऱ्या

पेडणे : पोलीस स्थानक हद्दीतील घरफोडी आणि मंगळसूत्र हिसकावण्याच्या प्रकरणातील टोळीतील तेजस गुरव (२८, मालपे पेडणे व मूळ राजापूर महाराष्ट्र) याला पेडणे पोलिसांनी अटक केली. यापूर्वी पोलिसांनी रोहन पडवळ व जगन्नाथ (केतन) बागकर या दोघांना अटक केली होती. संशयितांकडून आतापर्यंत १७.५६ लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
वाळपे-विर्नोडा येथील नीलेश प्रभाकर आरोंदेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.१० ते दुपारी १ या वेळेत चोरांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर स्टील कपाटाचे लॉक तोडून सुमारे ६ लाख किमतीचे सोन्याचे दागिने तसेच १ लाख रोकड असा एकूण ७ लाखांचा ऐवज चोरून नेला होता.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान रोहन महादेव पडवळ (वय २९, रा. वारपेवाडा, पेडणे) आणि त्याचा साथीदार जगन्नाथ उर्फ केतन संजय बागकर (वय २०, रा. रामनगर, कोलवाळ ) यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार या दोघांना २ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता अटक करण्यात आली.
चौकशीदरम्यान उघड झाले की, रोहन पडवळ आणि जगन्नाथ उर्फ केतन बागकर हे सराईत घरफोडे असून डिसेंबर २०२४ पासून पेडणे, धारगळ, विर्नोडा, तुये आणि कोरगाव परिसरात त्यांनी घरफोडी व दिवसा चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याविरुद्ध याआधीही अनेक घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पेडणे पोलीस निरीक्षक नितीन हळर्णकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, या टोळीतील तिसरा संशयित मालपे पेडणे येथील तेजस गुरव याला पेडणे पोलिसांनी अटक केली आहे.
१७.५६ लाखांचा मुद्देमाल केला होता जप्त
७ जानेवारी २०२६ रोजी जगन्नाथ उर्फ केतन बागकर याच्या सांगण्यावरून मालपे येथे चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. यात सोन्याचे मंगळसूत्र, नेकलेस, कानातले, चैन, अंगठ्या असे एकूण १२२.९८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच २६.५७ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने होते. जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत १७ लाख ५६ हजार ३१६ रुपये इतकी आहे.