तुरुंग महानिरीक्षकांचा आदेश : कोलवाळ तुरुंगातील प्रकार

पणजी : मुंगूल गँगवॉर प्रकरणातील सराईत गुन्हेगार अमोघ नाईक याची सशर्त जामिनावर सुटका झाली होती. सुटका झाल्यामुळे कोलवाळ तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर नाईक याच्या साथीदारांनी फटाके वाजवून जल्लोष केला. त्यात तुरुंग वाॅर्डन लक्ष्मण पाडलोस्कर याचा सहभाग असल्यामुळे त्याला निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश तुरुंग महानिरीक्षक केशव राम चौरासिया यांनी जारी केला आहे.
दक्षिण गोव्यातील मुंगूल - माडेल येथील शगुन हॉटेलनजीक १२ ऑगस्ट २०२५ रोजी गाडी अडवून तलवार, कोयता, सोडा बॉटल्सचा वापर करत संशयितांनी गोळीबारही केला होता. यात वॉल्टर गँगचे रफीक ताशान (२४) व युवकेश सिंग बदैला (२०) हे गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही टोळीच्या मिळून २८ जणांना अटक केली होती. या प्रकरणात सराईत गुन्हेगार अमोघ नाईकचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तो पोलिसांना शरण आला होता. पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतर न्यायालयाने सर्व संशयितांची सशर्त जामिनावर सुटका केली. दरम्यान, या प्रकरणातील सराईत गुन्हेगार अमोघ नाईक याची डिसेंबर २०२५ मध्ये सुटका केली होती.
अमोघ नाईक कोलवाळ तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर नाईक याच्या साथीदारांनी फटाके वाजवून जल्लोष केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओत तुरुंग वार्डन लक्ष्मण पाडलोस्कर याचा सहभाग असल्याचे समोर आले. याची दखल घेऊन तसेच पाडलोस्कर याच्या इतर कृत्याची दखल घेऊन तुरुंग अधीक्षक सुचिता देसाई यांनी अहवाल तयार केला. हा अहवाल तुरुंग महानिरीक्षक केशव राम चौरासिया यांना पाठवण्यात आला. याची दखल घेऊन महानिरीक्षकांनी लक्ष्मण पाडलोस्कर याला सेवेतून निलंबित केले.
हल्लीच गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने तुरुंगात कैद्याकडे मोबाईल आणि इतर प्रकारच्या वस्तू सापडल्यामुळे ताशेरे ओढले होते. तसेच तुरुंगात मोबाईल जॅमर, सीसीटीव्ही कॅमेरे, सेल्युलर इन्स्पेक्शन सिस्टम अशा उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे. दरम्यान, शनिवार १० रोजी अचानक छापा टाकून सुमारे २० मोबाईल फोन जप्त केले होते.
तुरुंग अधीक्षकांकडून अहवाल सादर
लक्ष्मण पाडलोस्कर याच्या कृत्याची गंभीर दखल घेत तुरुंग अधीक्षक सुचिता देसाई यांनी अहवाल तयार करून तो तुरुंग महानिरीक्षक केशव राम चौरासिया यांच्याकडे पाठवला. त्यानंतर पाडलोस्कर याला सेवेतून निलंबित करण्याचे आदेश जारी करण्यात आले.