बर्च क्लब दुर्घटना प्रकरण : बिजय कुमार सिंगला आठ दिवसांची कोठडी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
12 hours ago
बर्च क्लब दुर्घटना प्रकरण : बिजय कुमार सिंगला आठ दिवसांची कोठडी

म्हापसा : साकवाडी हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन’ क्लब आग दुर्घटना प्रकरणी क्लबचा ऑपरेशनल मॅनेजर बिजय कुमार सिंग (३८, रा. झारखंड) याला म्हापसा न्यायालयाने ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हणजूण पोलिसांनी शुक्रवार, ९ रोजी सायंकाळी संशयित आरोपी बिजय कुमार सिंग याला झारखंडमधून गोव्यात आणले होते. बर्च दुर्घटनेनंतर संशयित आरोपी आपल्या मूळ गावी झारखंड येथे पळून गेला होता. त्यापासून हणजूण पोलीस त्याच्या मागावर होते. तो आपल्या मुळ गावी असल्याची खात्री पटल्यानंतर पोलीस पथकाला झारखंडमध्ये पाठवण्यात आले होते.

या पथकाने झारखंडमधील छत्रोछेट्टी पोलीस स्थानकाच्या पोलिसांच्या मदतीने संशयिताला पकडून अटक केली. नंतर झारखंडमधील बेर्मो न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांडवर संशयिताला घेऊन हे पोलीस पथक शुक्रवारी गोव्यात दाखल झाले होते. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.

हणजूण पोलिसांनी शनिवारी सकाळी म्हापसा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने बिजय कुमार सिंग याला ८ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

दरम्यान, दुर्घटनेच्या दिवशी बिजय कुमार सिंग हा घटनास्थळी हजर होता. त्यानंतर तिथून त्याने गोव्याबाहेर पलायन केले होते. त्यापासून हणजूण पोलीस त्याचा शोध घेत होते. 

हेही वाचा