पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजद्वारे माग काढण्याचा प्रयत्न

म्हापसा : पर्रा येथे शनिवारी रात्री घरफोडीचा प्रयत्न झाल्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास तीन ते चार अज्ञात व्यक्ती एका गाडीतून परिसरात आल्या. त्यांनी एका घराच्या कंपाऊंडची भिंत ओलांडून मागच्या दाराकडे मोर्चा वळवला. त्यांचा घरात घुसण्याचा प्रयत्न सुरू असतानाच घरात उपस्थित असलेल्या एका मुलीच्या हे लक्षात आले. त्यावेळी घरातील इतर सदस्य वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. संशयितांना पाहताच मुलीने तत्काळ आरडाओरड करत शेजाऱ्यांना सावध केले. अचानक झालेल्या गोंधळामुळे घाबरलेल्या संशयितांनी आपला डाव अर्धवट सोडला आणि रहिवासी किंवा पोलीस पोहोचण्यापूर्वीच घटनास्थळावरून पळ काढला.
मंदिर चोरीच्या घटनेनंतर पुन्हा धक्का
ही घटना आदल्या रात्री घडलेल्या मंदिरातील चोरीच्या घटनेनंतर समोर आली आहे. चोरांनी कथितरित्या एका स्थानिक मंदिरात प्रवेश करून दानपेटी चोरली तसेच मूर्तीची विटंबना केली होती.या दोन घटनांमधील साधर्म्यामुळे परिसरात नवीन प्रकारची गुन्हेगारी टोळी सक्रिय झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
रात्रीच्या गस्तीची मागणी
निवासी भागांमध्ये रात्री पोलिसांची उपस्थिती मर्यादित असल्याने अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. वारंवार होणाऱ्या गुन्हेगारी कृत्यांवर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे. ग्रामस्थांनी पोलिसांकडे रात्रीची गस्त वाढवण्याची आणि संशयितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सीसीटीव्ही फुटेज ताब्यात
म्हापसा पोलिसांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलीस निरीक्षक नवीन देसाई यांनी सांगितले की, फुटेजमध्ये तीन ते चार व्यक्ती कंपाऊंडची भिंत ओलांडून घराकडे येताना स्पष्टपणे दिसत आहेत. आम्ही या प्रकरणाचा तपास करत असून, त्यात सामील असलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे देसाई यांनी सांगितले.
दरम्यान, याच घरात काही वर्षापूर्वी अशाचप्रकारे चोरी झाली होती. तेव्हा चोरांनी घरातील मुद्देमाल लंपास केला होता. परंतु ते चोर अद्याप सापडलेले नाहीत.