बार्देशमध्ये जत्रेतील पटस्थळी गुन्हेगारी प्रवृत्तीला ऊत

म्हापसा : राज्यात सध्या विविध देवस्थानांमध्ये जत्रा आणि वर्धापन दिन उत्सव सुरू आहेत. बार्देश तालुक्यात या जत्रोत्सवामध्ये पट, जुगार मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. जत्रेत जुगारात दीड ते दोन लाख रुपये गमावल्याच्या रागातून एका हिस्ट्रीशीटरने आपल्याजवळील शिल्लक रक्कम अक्षरशः कागदाप्रमाणे फाडून टाकल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली.
मरड जत्रेत गोंधळ, जुगार अर्ध्यावरच गुंडाळला
म्हापसा शहरातील एका जत्रेनिमित्त मरड येथे थाटलेला जुगार एका हिस्ट्रीशीटरच्या भावाने घातलेल्या राड्यामुळे अर्ध्यावरच गुंडाळावा लागला. पटवाल्यांशी झालेल्या वादावादीचे रूपांतर हातघाईत झाले. ‘इथे पट कसा चालतो तेच पाहतो,’ अशी धमकी देत तो आपल्या साथीदारांसह निघून गेला. त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या भावाच्या दहशतीमुळे पटवाल्यांनी जुगार बंद केला. मात्र, दोन दिवसांनी दुसऱ्या जत्रेत तोच जुगार पुन्हा सुरू करण्यात आला.
थिवीतील घटनेने खळबळ
थिवी परिसरातील एका जत्रेतील पट जुगारात घडलेली घटना सध्या संपूर्ण बार्देश तालुका आणि राज्यभरातील पटवाल्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. एका हिस्ट्रीशीटरने जुगारात सर्व पैसे गमावले. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा पैसे घेऊन आला, मात्र पुन्हा निम्मी रक्कम हरला. याचा राग अनावर झाल्याने त्याने जवळ असलेली सुमारे ३० ते ५० हजार रुपयांची रक्कम लोकांसमोरच फाडून टाकली आणि तिथून निघून गेला. हा प्रकार पाहून पटवाले आणि जुगारासाठी जमलेला युवकवर्गही थक्क झाला.
देवस्थान समिती, स्थानिक लोकप्रतिनिधी, पोलीस व प्रशासकीय यंत्रणांच्या आशीर्वादाने जत्रोत्सवांत पट जुगार खुलेआम चालवला जातो. त्यामुळे या बेकायदा जुगाराला कुणाचीही आडकाठी नसल्याने इथे हिस्ट्रीशीटरपासून छोटे-मोठे गुन्हेगार आपला दबदबा ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यातून पटवाल्यांसह विरोधी गुन्हेगारी टोळक्यासमवेत त्यांची वादावादी व मारामारी होते. नंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न समोर करत पोलिसांकडून हा जुगार बंद पाडला जातो.
म्हापसा शहरात बेकायदा जुगार क्लब खुलेआम
म्हापसा शहरातील दोन ठिकाणी गेल्या अनेक महिन्यांपासून स्थानिक प्रशासनाच्या ‘देखरेखीखाली’ रात्रीच्या वेळी पट जुगार क्लब सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील एक क्लब तर एका जुन्या व मोडकळीस आलेल्या हॉटेल इमारतीमध्ये सुरू असून, ही इमारत धोकादायक म्हणून पालिकेने घोषित केली आहे. विशेष म्हणजे, शेजारील महाराष्ट्रातूनही जुगारी आलिशान कारमधून येऊन या क्लबमध्ये रात्रभर पत्त्यांचा जुगार खेळत असल्याचे चित्र आहे.