वेर्णा पोलीस स्थानकात तक्रार दाखल

वास्को : हिरव्या मिरची व्यवसायामध्ये मोठा नफा मिळेल, अशी ग्वाही देऊन मोठी रक्कम गुंतविण्यास प्रवृत्त करून, आपली फसवणूक केल्याची तक्रार झुआरीनगर येथील नागराज याने वेर्णा पोलीस स्थानकात केली आहे. वेर्णा पोलिसांनी याप्रकरणी पुणे येथील साळुंके याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागराज व पुणे येथील साळुंके हे दोघेही व्यावसायिक आहेत. त्यामुळे ते दोघे एकमेकांच्या संपर्कात आले होते. साळुंके याने नागराज याला हिरव्या मिरच्यांना दुबई येथे मोठी मागणी आहे. त्यामुळे हिरव्या मिरच्यांना चांगला दर मिळत आहे. हिरव्या मिरच्या निर्यात करण्याच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळू शकतो, असे सांगितले होते. साळुंके याने यासाठी प्रवृत्त केल्याने नागराज याने २ सष्टेंबर २०२४ ते १९ सष्टेंबर २०२४ या दरम्यानच्या काळात दहा लाख साठ हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यानंतर साळुंके याने नागराज याच्या माहितीशिवाय व संमतीशिवाय बनावट सह्या करून व नागराजचा शिक्का वापरुन शिपमेंटसंबंधी कागदपत्रे तयार केली. त्या बनावट कागदपत्राचा वापर करून हिरव्या मिरच्या दुबईला पाठविल्या. त्यानंतर साळुंके दुबईला गेला. तेथे गेल्यावर काही दिवसांनंतर त्याने नागराज याच्याशी संपर्क साधला. दुबईच्या बाजारपेठेत हिरव्या मिरचीच्या दरात मोठी घसरण झाल्याने, मिरच्या अतिशय स्वस्त दरात विकल्या गेल्या, असे साळुंके याने नागराज याला सांगितले. स्वस्त दरात मिरच्या विकल्याने नागराज याचे सुमारे नऊ लाखांचे नुकसान झाले. साळुंके याने आपली फसवणूक केल्याची तक्रार नागराज याने केल्याने वेर्णा पोलिसांनी साळुंके याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजदत्त आर्सेकर पुढील तपास करीत आहेत.