‘बर्च’ दुर्घटनेवरून विधानसभेत गदारोळ

मुख्यमंत्री–विरोधकांत खडाजंगी; शुक्रवारी होणार चर्चा


25 mins ago
‘बर्च’ दुर्घटनेवरून विधानसभेत गदारोळ

सभागृहात बोलताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : हडफडे येथील ‘बर्च’ क्लब आग दुर्घटनेवरून विधानसभेत सलग दुसऱ्या दिवशी गदारोळ झाला. हा विषय न्यायप्रविष्ट असल्याचे सांगून सरकार मुद्दाम उत्तर देण्याचे टाळत असल्याचा आरोप विरोधकांनी केल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि विरोधकांमध्ये शाब्दिक संघर्ष झाला. अखेर या विषयावर शुक्रवारी चर्चा घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
बर्च दुर्घटनेसंदर्भातील मंगळवारी चर्चेसाठी आलेल्या तारांकित प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी पुढे ढकलल्याने विरोधक संतप्त झाले. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी ‘बर्च दुर्घटनेवर बोलण्यास मुख्यमंत्री का घाबरतात ?’ असा थेट सवाल केला. यावर मुख्यमंत्र्यांनी केवळ अतिरिक्त माहिती देण्यासाठी प्रश्न पुढे ढकलला असल्याचे सांगून शुक्रवारी तो चर्चेला येईल, असे उत्तर दिले. यावर विजय सरदेसाई यांनी ‘आजच्या कामकाजात प्रश्नसूचीत असलेला प्रश्न कोणत्या कायद्यानुसार पुढे ढकलला ?’, असा सवाल केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कलम ४९(२) अंतर्गत उत्तर अद्ययावत करण्यासाठी प्रश्न पुढे ढकलला असून, लपवण्यासारखे काहीही नाही. शुक्रवारी सकाळी ११.३० वा. हा प्रश्न सर्वप्रथम घेतला जाईल आणि स्पष्ट उत्तर दिले जाईल.
अभिभाषणात बर्च दुर्घटनेचा उल्लेख नसल्याचा आरोप करून विरोधकांनी गोंधळ घातला. मात्र मुख्यमंत्री म्हणाले की, अभिभाषणातील क्रमांक २०२ मध्ये दुर्घटनेचा स्पष्ट उल्लेख आहे. घडलेली घटना मांडली आहे. विरोधकांनी पहिल्या दिवशीच गोंधळ घातला. यावेळी मुख्यमंत्री आणि सरदेसाई यांच्यात शाब्दिक चकमक झाली.
मंत्रिमंडळ प्रश्नावरूनही वाद
मंत्रिमंडळ बैठका व पोस्ट-फॅक्टो मान्यतेसंदर्भातील अतारांकित प्रश्नाला कलम ३१(१५) अंतर्गत गोपनीयतेचे कारण देत उत्तर न दिल्याने विरोधकांनी आक्षेप घेतला. सरकार नेमके काय लपवत आहे, असा सवाल उपस्थित करून २०२४ मध्ये मंत्रिमंडळासंबंधी प्रश्नांची उत्तरे दिली होती, मग आता गुप्तता कशाची, असा प्रश्न विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला. विधानमंडळ सचिवांकडून सभागृहाची दिशाभूल होत असल्याचाही आरोप त्यांनी केला.