बाबुसो दादाच्या ‘कॅफे सेंट्रल’च्या उरल्या फक्त आठवणी

धोकादायक बांधकाम नगरपालिकेकडून जमीनदोस्त

Story: संजय कोमरपंत । गोवन वार्ता |
12th January, 10:02 pm
बाबुसो दादाच्या ‘कॅफे सेंट्रल’च्या उरल्या फक्त आठवणी

काणकोण : चावडी येथील जुन्या बसस्थानकाजवळ नगर्से येथील बाबुसो नाईक ‘कॅफे सेंट्रल’ नावाचे हॉटेल चालवायचे. गेली कित्येक वर्षे हे हॉटेल अनेक घडामोडींच्या चर्चेचे साक्षीदार होते. काणकोणातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व इतर गोष्टींचा हा ‘अड्डा’ होता. मात्र या हॉटेलचे बांधकाम धोकादायक ठरवल्यामुळे नगरपालिकेकडून जमीनदोस्त करण्यात आले आणि काणकोणच्या इतिहासाचा एक मूर्तीमंत साक्षीदार काळाच्या उदरात गडप झाला.
चावडी काणकोण जुन्या बसस्थानकाजवळ नगर्से येथील बाबुसो नाईक ‘कॅफे सेंट्रल’ नावाच्या हॉटेलमधून काणकोणमधील व काणकोणबाहेरुन येणाऱ्या लोकांना चहा, फराळ द्यायचे. चाररस्ता येथील कामतीच्या हॉटेलमध्ये मिक्स भाजी, भास्कराच्या हॉटेलमधील शिरा तर बाबुसो दादाच्या हॉटेलमधील फेणोरी व चिरुटी हे जिन्नस प्रसिद्ध होते. बाबुसो दादाचे कॅफे सेंट्रल फक्त चहा फराळाचेच हॉटेल नव्हते, तर त्यावेळच्या मगो पक्षाच्या कार्यकर्त्याचे बसण्याचे ठिकाण सुद्धा होते. बाबुसो दादाच्या हॉटेलच्या बाहेर दोन बाकडे हे राजकीय चर्चा व काणकोणमधील विविध प्रश्नावर चर्चा करण्याचे ठिकाण होते. त्या करीता ते बाकडे ठेवले होते. असे म्हटल्यास वावगे ठरू नये. पांढरा शुभ्र शर्ट, काळी पेंट घालून बाबुसो दाद गल्ल्यावर बसायचे व तेथून आपल्या हॉटेलमधील १०-१५ वेटरकडून हॉटेलात येणाऱ्यांना सेवा द्यायचे. बाबुसोदाद गल्ल्यावर बसलेले सर्वांना दिसायचे. मात्र पहाटे चार वाजता उठून भाजी, चहा, बटाटवडे ते तयार करायचे व नंतर गल्ल्यावर बसायचे. बाबुसोदादाच्या याच हॉटेलवर गोमंतकातील वर्तमानपत्रे व मुंबईची वर्तमानपत्रे सुद्धा मिळायची. उमाकांत दलालाच्या व बाबुसोदादाच्या दुकानावरच लोकाना स्थानिक व देश, विदेशातील माहिती फक्त वर्तमानपत्रातून समजायची.
इतिहासाच्या खुणा पुसल्या
आज बाबुसोदाद व इतरांची दुकाने असलेली जुनी जीर्ण धोकादायक इमारत काणकोण पालिकेने जमीनदोस्त केली. या जमीनदोस्त केलेल्या इमारतीबरोबरच या ज्या इमारतीत असलेल्या कॅफे सेंट्रल हॉटेलात जे जे काणकोणचे नेते घडले आहेत, ते हॉटेल आज जमीनदोस्त होण्याबरोबरच बाबुसोदाद व काणकोणच्या राजकीय व सामाजिक आंदोलनाच्या इतिहासाच्या खुणाही आज जमीनदोस्त झाल्या आहेत.